शिवमंदिरांच्या राज्यात – शिवपुरी धर्मापुरी

>> नीती मेहेंदळे

बीड जिल्ह्यात अंबेजोगाईप्रमाणेच जवळ धर्मापुरी हे एक प्राचीन नगर आहे. सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव अशा विविध राजवटींमधे मराठवाडा विभागात सरस स्थापत्यविशेष उभारले गेले. बीड जिल्हाही असाच प्राचीन स्थापत्यांनी समृद्ध जिल्हा. अंबेजोगाईहून 30 किलोमीटर अंतरावर धर्मापुरी आहे. गावात निजामशाहीच्या काळात बांधलेला किल्ला प्रथम थोडय़ाच उंचशा जोत्यावर उभा लक्ष वेधून घेतो. किल्ल्याची काही प्रमाणात पडझड झाली असली तरी बुरुज आजही भक्कम दुर्गरचनेची ग्वाही देतात. किल्ल्याच्या उत्तरेस खडकाळ भागी शतात केदारेश्वर मंदिर योजलेलं दिसतं. चालुक्य राजा पामादित्य सहावा याचा मुलगा सोमेश्वर याने धर्मापुरी नगरी वसवली असे सांगितले जाते. किल्ल्याइतकीच शिवमंदिर स्थापत्यरचनांसाठी धर्मापुरी प्रसिद्ध आहे.

पत्रलेखिकेच्या मनमोहक शिल्पासाठी व अशा अनेक शिल्पाविष्कारांसाठी प्रसिद्ध असलेलं केदारेश्वर हे धर्मापुरीचे वैशिष्टय़पूर्ण मंदिर आहे. मंदिराची रचना मुखमंडप, अर्धमंडप, अंतराळ, गाभारा अशी आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप आणि अर्धमंडप आता पूर्ण भग्न अवस्थेत आहे. मुखमंडप स्तंभांवर तोलून धरलेला असावा, कारण त्याचे स्तंभावशेष मंदिर परिसरात दिसतात. मंडपाच्या उत्तर व दक्षिण बाजूला असे दोन अर्धमंडप असावेत. मोडकळीस आलेले अर्धमंडपाचे छत त्रिकोणी आकाराचे आणि जवळच्या पानगावमधल्या मंदिरांमधल्या छतासारखे आहे.

तीस फुटी चौरसाकारात मंडप असून मध्यभागी रंगशिळा आहे. मंडपात स्तंभ असून त्यांनी छत तोलून धरले आहे. अंतराळाचे छतही मंडपाच्या छतासमान आहे. गर्भगृहात कोणतेच कोरीवकाम नाही. त्याची द्वारशाखा विपुल आहे. पाच द्वारशाखा असून लताशाखा-पुष्प, प्राणीशाखा-व्याल, स्तंभशाखा- कलश व भौमितिक नक्षी अशा संपन्न आहेत. अंतराळ व गर्भगृहाच्या बाहेरचे भाग क्षिप्त व प्रक्षिप्त असून त्यावर कोरीव शिल्पकाम आहे. एकूण सत्तरेक मूर्ती कोरलेल्या आहेत. त्या शैव-वैष्णव तसेच शाक्त संप्रदायाच्याही प्रातिनिधिक आहेत. यात सूरसुंदरी, शालभंजिका, नृसिंह, वराह, काली, ब्रम्हा, विष्णू यांच्या मूर्ती असून वासुदेवाची मूर्ती गर्भगृहाबाहेरच्या देवकोष्ठात आहे. शिवाय मंदिराच्या मंडोवरावरच्या शिल्पसमुदायात विष्णूच्या केशवादी चोवीस प्रतिमा आढळतात.

गोमुखाप्रमाणे वराहमुखातून गाभाऱयातील पाणी उत्सर्जित करण्याची रचना केलेली दिसते. हे केवळ वराहमुख नसून एक वराहरथ आहे असे निरीक्षणांती दिसते. एक सारथी लगाम आवळून रथ ओढतो आहे. वराहाच्या पायात तोडे आहेत, गळय़ात पोवळय़ाची माळ, मागे अंबारी असा थाट पाहून शिल्पकाराचे कौतुक वाटते. शिखर भग्न आहे. मंदिरात एक शिलालेख असून त्यावरून या मंदिराची अकराव्या शतकातले चालुक्य राजवटीतले मंदिर अशी कालनिश्चिती करता येते. बाह्यभिंतीवरील पत्रलेखिका ही त्रिभंगावस्थेत उभी सुरसुंदरी आहे आणि ती राजाची प्रशस्ती लिहिते आहे अशी शिल्परचना व प्रस्तुत संस्कृतातला शिलालेख त्याच शिल्पात योजणे हे अतिशय कलात्मक मांडणीचे निदर्शक आहे.

याखेरीज धर्मापुरीत सोमेश्वर, रोकडेश्वर, संचारेश्वर, त्रिगुणेश्वर अशा केदारेश्वरला समकालीन मंदिरं असणे हा निव्वळ योगायोग नसून तो तत्कालीन श्रद्धा, समृद्धी व स्थापत्यकौशल्याचा मौल्यवान पुरावा आहे. जवळच मरळसिद्ध मल्लिकार्जुन हे तितकेच प्राचीन शिवमंदिर असून तिथे एक आयताकृती मोठी बारवही आहे. येथेही अनेक सुटी शिल्पं मांडून ठेवलेली दिसतात. त्यात महत्त्वाचे एक सूर्यनारायणाचे शिल्प आहे. डोक्यावर सात फण्यांचा साप, हातात दोन फुललेली कमळं आणि दक्षिण भारतीय संकेताप्रमाणे पाय उघडे असा हा सूर्यनारायण मंदिराबाहेर एका कोपऱयात मांडलेल्या शिल्पांमधे दिसतो. सोमणवाडी या शेजारच्या गावातही चालुक्यकालीन बारव आहे.

या शिल्पसमृद्ध धर्मापुरीत एखादे वस्तुसंग्रहालय असायला हरकत नसावी. कारण तिथे घर बांधायला खणती लावली की असा ऐवज हमखास सापडतो आणि याचं संवर्धन करणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे हे आपल्या घटनेतच लिहिलं आहे.

[email protected]