शेअर बाजारात हडकंप! आयटी कंपन्यांना जबरदस्त दणका

डोनाल्ड ट्रम्प सरकारने एच-1बी व्हिसाच्या शुल्कात केलेल्या जबर वाढीचे नकारात्मक पडसाद आज शेअर बाजारात उमटले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक आज सव्वाशे तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 466 अंकांनी गडगडला. व्हिसा शुल्क वाढीचा सर्वात मोठा फटका आयटी उद्योगाला बसणार असल्याने या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली.

अमेरिका सरकारने कर्मचारी व्हिसाचे शुल्क 6 लाखांवरून थेट 88 लाखांवर नेले आहे. अमेरिकी आयटी कंपन्यांमध्ये जसे लाखो हिंदुस्थानी आहेत तसेच हिंदुस्थानी आयटी कंपन्यांच्या अमेरिकेतील प्रोजेक्ट्सवरही हजारो हिंदुस्थानी काम करत आहेत. त्यामुळे अमेरिकेत बाहेरच्या आयटी तंत्रज्ञांना रोजगार द्यायचा असेल तर सर्वच आयटी कंपन्यांना अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. हिंदुस्थानच्या 283 अब्ज डॉलर्सच्या आयटी उद्योगावर हा जबर आघात आहे. त्यामुळेच या कंपन्यांचे शेअर्स आज कोसळले.

सोशल मीडियातील काही मासलेवाईक प्रतिक्रिया

अमेरिकेत न जाणाऱयांचे आधी 6 लाख रुपये वाचायचे, आता 88 लाख रुपये वाचणार, मास्टर स्ट्रोक

हिंदुस्थानात राहा. मोदींचा अमृतकाळ सुरू आहे. z या तुम्ही पण इंडियात, 5 किलो रेशनची व्यवस्था केली आहे मोदींनी. लय मोदी मोदी मोदी करत होतात…

परदेशात राहून देशवासीयांना देशभक्तीचे धडे देणारे आणि परदेशात राहून विषमतेचे धडे देणाऱया सर्व प्रिय भारतीयांनी आपल्या देशात राहून देशाचा मान वाढवावा.

बेधडक परत या भक्तांनो… 5 किलो रेशन, टाळ्या थाळ्या, कुंभमेळा, कावड यात्रा, ढोलताशे पथक तुमची वाट पाहत आहे… भारताला जगात 1 नंबर बनवून अमेरिकेला चांगला धडा शिकवूया…

अमेरिकेतील सर्व प्रकारच्या त्रासाला फक्त एकच व्यक्ती जबाबदार आहे… 56 इंच का सीना…

टेन्शन घेऊ नका. पुढील महिन्यात सोयाबीन सोंगायला येत आहे. खूप काम आहे. परत या.

निफ्टी आयटी निर्देशांकात 1078 अंकांची घसरण झाली. सर्वाधिक नुकसान टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसीस, विप्रो, एचसीएल टेकचे झाले. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसचे शेअर तीन टक्क्यांपेक्षा जास्त घसरले.

अमेरिकेतील हिंदुस्थानी चिंतेत… पुढे काय होणार?

अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाचा अर्थ अनेक कायदेतज्ञांनाही लागेनासा झाला आहे. त्यामुळे व्हिसाधारकांच्या चिंतेत भर पडली आहे. हे कर्मचारी संभ्रमात आहेत. अमेरिकेतून बाहेर पडल्यास पुन्हा तिथे प्रवेश मिळेल का आणि मिळालाच तर कंपनी नोकरीवर ठेवेल का, ही चिंता त्यांना आहे.

सोशल मीडियावर उपहास, अमृतकाळ सुरू आहे, परत या!

सोशल मीडियात उपरोधिक शब्दांत मोदी सरकारची खिल्ली उडवली जात आहे. मोदींच्याच घोषणांचा व बॉलिवूडच्या गाण्यांचा आधार घेत नेटकरी सरकारला झोडून काढत आहेत. मोदींचा अमृतकाळ सुरू आहे, परत या, अशी खोचक साद काहींनी व्हिसाधारकांना घातली आहे.