नेपियन-सी मार्गावरील रस्ते होणार एकसमान, पादचारी, ज्येष्ठ, दिव्यांगांची दमछाक थांबणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपियन सी रोडवरील सर्व रस्त्यांचे प्रमाणीकरण (स्टॅण्डर्डलायझेशन) करून ते एकसमान बनवले जाणार आहेत. त्यामुळे पादचाऱयांसह ज्येष्ठ, दिव्यांगांना अधिक मोकळे आणि सुटसुटीत रस्ते उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर तिथले जंक्शन हे सिग्नलमुक्त करून वाहतूक बेटही तयार केले जाणार आहे. महानगरपालिकेच्या पुढाकाराने ही योजना राबवली जाणार असून मुंबईतील अशा प्रकारची ही पहिलीच योजना आहे.

नेपियन-सी रोड या उच्चभ्रू वसाहतीतील सेंट स्टीफन चर्च ते मलबाल हिलपर्यंतच्या रस्त्यावर पुढील आठवडय़ापासून पालिकेकडून नवीन बदल केले जाणार आहेत. या रस्त्यांची रुंदी एकसमान म्हणजे 6.5 मीटर केली जाणार आहे. त्यामुळे तिथे पादचाऱयांसह ज्येष्ठ, दिव्यांगांना चालणे अधिक सुलभ व सोपे होणार आहे. पालिका, स्थानिक आणि उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) फुटपाथ, महत्त्वाची ठिकाणे, बसस्थानकांचा कायापालट करून आधुनिक सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर एनआरसीएफ, आर्किटेक्ट राहुल काद्री, जेएसडब्ल्यू फाउंडेशनतर्फे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे.

बस थांब्यांची लांबी वाढणार

रस्त्यांबरोबर बस स्थानकांकडे येणाऱया बेस्टच्या बसेस कोणत्याही अडथळय़ाविना ये-जा करू शकतील याकडे भर दिला जाणार आहे. बस थांब्यांची लांबी 30 मीटर ठेवली जाणार असल्याने बससेवा अधिक सुलभ होणार आहे.