देवाकडे काहीतरी मागणे हा माझा स्वभावच नाही- पंतप्रधान मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

केदारनाथ देवस्थानाची भेट घेण्याची परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले. मोदी यांनी केदारनाथ येथील गुहेत 17 तास ध्यानधारणा केली. त्यानंतर येथील मंदिरात पूजाअर्चा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देवाची पूजाअर्चा केल्यानंतर प्रार्थना करताना त्याच्याकडे काहीतरी मागणे हा आपला स्वभावच नसल्याचे ते म्हणाले.

हिंदुस्थानातील जनतेला सुखी ठेव, त्यांचे कल्याण कर अशी प्रार्थना मी देवाकडे केल्याचे मोदी म्हणाले. लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात असताना अशा वातावरणात आपल्याला केदारनाथ मंदिराला भेट देता आली याबद्दल स्वतःला नशीबवान समजतो, असेही मोदी यावेळी म्हणाले.  

मोदींवर आचारसंहिता उल्लंघनाचा तृणमूल काँग्रेसचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिराला दिलेली भेट आचारसंहितेचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. याबाबत तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पक्षाचे प्रवक्ते डेरेक ओ’ब्रायन यांनी याबाबत आयोगाला एक पत्र पाठवले आहे. मोदी यांची ही भेट प्रसारमाध्यमांकडून राष्ट्रीय स्तरावर दाखवली जात आहे. हे नैतिकदृष्ट्या अत्यंत चुकीचे असल्याचे ओ’ब्रायन यांनी पत्रात म्हटले आहे.