‘झोपताना शेजारी फोन चार्जिंगला ठेवू नका’; Apple ची युझर्सना चेतावणी

 

युझर्सच्या आरोग्यावर होणारे संभाव्य नकारात्मक प्रभाव लक्षात घेत फोन जवळ ठेवून झोपण्याशी संबंधित संभाव्य तोटे अनेक अभ्यासांनी आधीच अधोरेखित केले आहेत.

Apple, iPhones च्या निर्मात्यानं अलीकडेच अशा व्यक्तींसाठी स्पष्ट आणि थेट सावधगिरीचा संदेश जारी केला आहे. ज्यांना त्यांचे स्मार्टफोन जवळ बाळगून झोपण्याची सवय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे डिव्हाइस चार्ज होत असताना जवळ ठेवून झोपणं अयोग्य आहे. अॅपलच्या ऑनलाइन युजर गाइडमध्ये या चेतावणीचा समावेश करण्यात आला आहे.

फोन सोबत येणाऱ्या मॅन्युअलमध्ये कंपनीनं सल्ला दिला आहे की iPhones केवळ हवेशीर असलेल्या वातावरणात आणि टेबलासारख्या सपाट पृष्ठभागावर चार्ज केले जावेत, ब्लँकेट, उशीजवळ किंवा तुमच्या शरीरावर चार्जिंगला ठेवू नये.

यामधील सल्ल्यानुसार, आयफोन चार्जिंग प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमणात उष्णता निर्माण होते. फोन गरम होण्याची शक्यता असते. जेव्हा ही उष्णता मर्यादित जागेमुळे सहज मोकळ्या वातावरणात जात नाही, तेव्हा ती जळण्याचा किंवा अधिक गंभीर प्रकरणांमध्ये, आग लागण्याचा धोका असतो. परिणामी, तुमच्या उशीच्या खाली चार्जिंग फोन ठेवणे हे स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी सर्वात असुरक्षित पद्धतींपैकी एक ठरू शकते.

अॅपलने खराब झालेले केबल्स किंवा चार्जर न वापरण्याचा किंवा आर्द्रता असताना चार्जिंग न करण्याचा सल्ला दिला.