
जगभरात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढत आहे. ब्रिटनमध्ये काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा नवा स्टेन आढळल्यानंतर त्याचा फैलाव झपाट्याने होत होता. आता सोमवारी फ्रान्समध्ये कोरोनाचा नवा आढळल्याने कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोरोनाचा नवा स्टेन आढळल्याची माहिती सोमवारी फ्रान्सच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
फ्रान्सच्या लानियन येथील एका रुग्णालयात हा नवा स्टेन आढळला आहे. कोरोनाच्या इतर स्टेनपेक्षा हा वेगळा असल्याचे प्राथमिक विश्लेषणातून दिसत असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीच्या काळात हा जास्त संक्रामक नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे स्टेन काही काळात स्वरुप बदलत असल्याने त्याचा फेलाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फ्रान्समध्ये नवा स्टेन आढळल्यानंतर 24 तासात कोरोनाबाधितांची संख्या 4 हजारने वाढली आहे. तर आयसीयूमध्ये 92 रुग्णांची वाढ झाली आहे. 24 तासात 4,219 नवे रुग्ण आढळले आहेत. ही संख्या नोव्हेंबर 2020 नंतरची सर्वाधिक संख्या आहे, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत फ्रान्समध्ये कोरोनामुळे 90, 762 जणांचा मृत्यू झाला आहे.
पॅरिस शहरात गेल्या आठवड्यात आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राजधानी पॅरिसमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने इतर ठिकाणी कोरोनाबाधितांना स्थलांतरीत करण्यात येत आहे. त्यामुळे राजधानीतील आरोग्य सेवेवरील ताण कमी होणार आहे.
सोमवारी 6,471 नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली होती. गेल्या सोमवारपेक्षा ही संख्या 4.3 टक्क्यांनी जास्त आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी फ्रान्समध्ये लसीकरण मोहिमेला गती देण्यात येत आहे. गेल्या 24 तासात 1,85 000 जणांना लस देण्यात आली आहे. लसीचा एक डोस घेतलेल्यांना संक्रमण झालेल्यांची संख्याही जास्त असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. कोरोनाच नवा स्टेन आढळल्याने विशेष काळजी आणि दक्षता घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.




























































