
होणार… लवकरच होणार… अशा घोषणांनंतर अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या बुधवारी टेकऑफ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. हे विमानतळ एकूण एक लाख कोटींच्या खर्चाचे असेल अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष आणि एमडी विजय सिंघल यांनी दिली. विमानतळाच्या उद्घाटनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून टेकऑफसाठी अवघा 84 तासांचा अवधी उरला आहे.
मुंबई विमानतळ हे चार टप्प्यांत उभे राहणार असून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यावर जवळपास 19 हजार 647 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. सिडकोने आतापर्यंत या प्रकल्पावर सुमारे तीन हजार 500 कोटी रुपये खर्च केले आहेत.
प्रवासी सेवा डिसेंबरपासून
सीआयएसएफला विमानतळावर आपल्या सुरक्षा यंत्रणेचे नियोजन करण्यासाठी सुमारे 45 दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर नवी मुंबई विमातनळावरून येत्या डिसेंबरमध्ये प्रवासी सेवा सुरू होणार आहे. नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम लगेच सुरू करण्यात येणार आहे. हे काम 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.