
सामना ऑनलाईन । रांची
रोबोट ‘सोफिया’च्या धर्तीवर हिंदुस्थानी बनावटीची पहिली माणसासारखी दिसणारी ‘रश्मी’ नावाची रोबोट लवकरच जगासमोर येणार आहे. ‘रश्मी’चे वैशिष्टय़ म्हणजे ती इंग्रजी आणि हिंदीसह मराठी आणि भोजपुरी भाषाही फाडफाड बोलू शकते.
रांचीतील रंजीत श्रीवास्तव यांनी ‘रश्मी’च्या निर्मितीची जबाबदारी उचलली असून त्यांचा दावा आहे की ‘रश्मी’ जगातील पहिली हिंदी बोलणारी रोबोट असणार आहे. ‘‘रश्मी’च्या शरीराचा ८० टक्के भाग पूर्ण झाला असून आता केवळ हात आणि पाय तयार होणे बाकी आहे. २०१५ मध्ये रोबोट ‘सोफिया’चा जन्म झाला होता. २०१७ मध्ये ‘सोफिया’ला सौदी अरेबियाचे नागरिकत्वही मिळाले होते. ‘सोफिया’प्रमाणे ‘रश्मी’ स्वतःच्या भावना व्यक्त करण्याबरोबरच लोकांना ओळखणारही आहे.
‘रश्मी’चा निर्मिती खर्च ५० हजार
रंजीत श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘रश्मी’च्या निर्मितीसाठी ५० हजार रुपये खर्च आला आहे. ‘रश्मी’ला बनविण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. ‘रश्मी’ला पूर्णरीतीने तयार होण्यासाठी आणखी एक महिना लागणार आहे. सध्या तरी ती डोळे, पापण्या आणि ओठांच्या हालचाली करते. तसेच मान फिरवून इशारेदेखील करते. एक-दोनदा भेटल्यानंतर ती एखाद्या व्यक्तीला सहज ओळखूही शकते.




























































