
नव्या वर्षात बऱयाच नियमांत बदल होणार आहेत. बँकेच्या काही सेवेसाठी ग्राहकांना चांगलाच भुर्दंड बसणार आहे. क्रेडिट कार्डचे शुल्क महाग होणार असून बँकेच्या अन्य काही सेवांसाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे भरावे लागणार आहेत. याआधी बँकांनी काही सेवांसाठी शुल्कात वाढ केली होती. यामध्ये प्रामुख्याने एटीएममधून पैसे काढणे, क्रेडिट कार्ड, चेकबुक जारी करणे यांसह अन्य काही सेवांसाठी शुल्कात वाढ केली होती. तसेच काही फ्री मिळणाऱया सुविधासुद्धा अचानक बंद करण्यात आल्या होत्या. 2026 या नव्या वर्षातही बँका ग्राहकांना दे धक्का देणार आहेत. काही बँका वॉलेट ऍप्सची सेवा मर्यादित करण्याच्या आणि शुल्कात वाढ करण्याच्या तयारीत आहेत.
आयसीआयसी बँक नव्या वर्षात आपली सेवा महाग करणार आहे. 15 जानेवारी 2026 पासून क्रेडिट कार्डद्वारे गेमिंग प्लॅटफॉर्मवर केल्या जाणाऱया व्यवहारांवर दोन टक्के शुल्क आकारले जाणार आहे. तसेच ऍमेझॉन, पेटीएम, मोबिक्विक यांसारख्या थर्ड पार्टी वॉलेट ऍप्समध्ये पाच हजारांपेक्षा जास्त रक्कम पाठवल्यास त्यावर एक टक्का शुल्क द्यावे लागणार आहे. जर बँकेच्या शाखेत जाऊन रोखीने क्रेडिट कार्डचे बिल भरले तर त्यावरही आता जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. आता यासाठी 100 रुपये शुल्क आहे, परंतु बदल झाल्यानंतर 150 रुपये शुल्क द्यावे लागेल. बँकेकडून इंस्टंट प्लॅटिनम कार्डवर बुक माय शोद्वारे दिल्या जाणाऱया मोफत चित्रपटाच्या सवलतीसुद्धा 1 फेब्रुवारी 2026 पासून बंद केल्या जाणार आहेत. काही क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे वॉलेटमध्ये पैसे टाकल्यास 1.5 टक्के सर्व्हिस चार्ज लावला जात आहे.
25 हजार खर्च करणे आवश्यक
क्रेडिट कार्डस्वर चित्रपट ऑफरचा लाभ घेण्यासाठी आता मागील तिमाहीत कमीत कमी 25 हजार रुपये खर्च करणे आवश्यक आहे, अशी अट ठेवण्यात आली आहे. रूबिक्स आणि सॅफिरोसारख्या क्रेडिट कार्डवर दर महिन्याला 20 हजार रुपये खर्च केल्यानंतरच रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. प्लॅटिनम आणि कोरल कार्डस्साठी ट्रान्सपोर्ट खर्चाची मर्यादा प्रति महिना 10 हजार निश्चित करण्यात आली आहे.
एअरटेलचाही दणका
एअरटेल पेमेंट बँकेने 1 जानेवारीपासून वॉलेटवर 75 रुपये प्रति वर्ष जीएसटी वगळून वार्षिक देखभाल शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जर शुल्क आकारताना खात्यात पुरेशी शिल्लक नसेल तर उपलब्ध शिल्लक वजा केली जाईल. ही रक्कम पुढील वेळी पैसे जमा झाल्यावर आपोआप कापली जाईल.




























































