धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत आजपासून नवी नियमावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत या वर्षी हिवाळा सुरू होण्याआधीच धूळ प्रदूषण वाढल्याने हवेची गुणवत्ता खालावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी उद्या सोमवार, 23 ऑक्टोबरपासून नवी नियमावली जारी करण्यात येणार असून बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी 15 दिवसांत प्रिंक्लर आणि महिनाभरात स्मॉग गन लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. ही उपकरणे लावली नाहीत तर मुंबई महापालिका विकासकाला जागच्या जागी ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावणार आहे.

मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणची धूळ प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी पालिकेचे विविध विभाग आणि मुंबईतील एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी, विकासकांच्या संघटनांची संयुक्त बैठक पार पडली.

मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅनवर अद्यापही कार्यवाही नाही
मुंबईत एअर क्वालिटी इंडेक्स वाढत आहे आणि हवेची गुणवत्ता खालावत आहे. हा मुद्दा मागच्या वर्षीही आला होता… आमचे सरकार असताना मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅन जारी केला होता, जो आजही मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर आहे. दुर्दैवाने, प्रत्यक्षात सरकार नसून राजवट असलेल्या सध्याच्या सरकारने यावर अद्याप कुठलीही कार्यवाही केलेली नाही, अशी टीका शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर केली आहे.

अशी आहे नवी नियमावली
– एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान 35 फूट उंचीचे लोखंडी/पत्र्यांचे आच्छादन असावे. त्याशिवाय संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपडय़ाने झाकलेले असावे.
– प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्प्रिंक्लर असावेत. धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान 4 ते 5 वेळा पाण्याची फवारणी करावी. रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अॅण्टी स्मॉग मशीन लावावीत.
– प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मनुष्यबळाच्या संरक्षणासाठी मास्क, चष्मा इत्यादी संरक्षण साहित्य दिले जावे.
– डेब्रिज वाहतूक करणारे वाहन झाकलेले असावे. डेब्रिज ने-आण करताना प्रत्येक खेपेच्या वेळी तुषार फवारणी करावी. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत.