
नववर्ष म्हटले की, घराघरात नवीकोरी दिनदर्शिका आलीच. नववर्षाच्या स्वागताबरोबरच वर्षभराच्या कामाचे चोख नियोजन करण्यासाठी उपयोगी पडणाऱया या दिनदर्शिका बनवण्याच्या कामात यंदा विविध सामाजिक संस्था, संघटना आणि सार्वजनिक मंडळांनी आघाडी घेतली आहे. या लोकोपयोगी दिनदर्शिकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
दहिसर प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी कोविडच्या काळात केलेल्या कार्य अहवालाचे आणि दिनदर्शिका 2021 चे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे सन 2021च्या रौप्यमहोत्सवी दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, कार्याध्यक्ष राम कदम, कोषाध्यक्ष विलास भुजबळ, आदिनाथ हिरवे, चंद्रकांत झगडे, सतीश सावंत, संजय सावंत, तानाजी आरज, रवींद्र पास्ते, रेखा संखे उपस्थित होते.


























































