
नववर्षाच्या स्वागताला जिल्ह्यात पर्यटकांचे आगमन झाले असून समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची रेलचेल आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनारी पर्यटक मौजमजा करताना दिसत आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी अलिबागला पंसती दिल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पर्यटकांची आणि वाहनांची वाढती संख्या पाहता स्थानिक आणि जिल्हा पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहेत.
सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक रायगड जिल्ह्याला पहिली पसंती देत आहेत. शनिवापासूनच अनेक पर्यटक नववर्ष साजरे करण्यासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले असून घोडा, उंट सफारी, बोटिंग, केटीएम रायडिंगचा आनंद पर्यटक घेत आहेत. तर बच्चे कंपनीही पाण्यात भिजत मजा करीत आहेत. पराग्लायडिंगचा आनंदही पर्यटक घेत आहेत. कुलाबा किल्यावरही पर्यटक जाऊन ऐतिहासिक किल्ला पाहत आहेत. समुद्र किनाऱ्यासह जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक वास्तू याठिकाणीही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल झाले असून वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. जिल्हा वाहतूक पोलिसही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहेत. स्थानिक प्रशासनानेही समुद्र किनारी जीवरक्षक तैनात केलेले आहेत. पोलिसांनीही पर्यटन स्थळांवर चोख बंदोबस्त ठेवला आहे.

























































