सीमा हैदरच्या अडचणी वाढल्या
पाकिस्तानातून नेपाळमार्गे हिंदुस्थानात येऊन लग्न करणाऱया सीमा हैदरच्या अडचणी वाढल्या आहेत. तिचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरकडून दाखल केलेली याचिका जिल्हा न्यायालयाच्या फॅमिली कोर्टाने स्वीकारली.न्यायालयाने सीमा आणि सचिन यांच्यासह त्यांचे वकील ए. पी. सिंह आणि लग्न लावून देणाऱया पंडितांना समन्स बजावले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 मे रोजी होणार आहे. मोमीन मलिक हे सीमाच्या पाकिस्तानी पतीचे वकील आहेत.
अबब! सूर्यापेक्षा तिप्पट मोठे ब्लॅकहोल!!
आकाशगंगेतील सर्वात रहस्यमय गोष्टींपैकी एक म्हणजे ब्लॅक होल म्हणजेच कृष्णविवर. जवळ येणारी कुठलीही गोष्ट या ब्लॅकहोलमध्ये हरवते. प्रत्येक आकाशगंगेत असे ब्लॅकहोल असते. खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेतील अशाच सर्वात मोठय़ा स्टेलर ब्लॅक होलचा शोध लावला आहे. हे ब्लॅक होल पृथ्वीपासून अवघ्या 2 हजार प्रकाशवर्षे अंतरावर आहे. बीएच3 नावाच्या या ब्लॅकहोलचे वस्तुमान सूर्यापेक्षा 33 पट अधिक आहे. आकाशगंगेतील मोठय़ा ताऱयांचा स्पह्ट होतो तेव्हा अशा प्रकारचे ब्लॅक होल तयार होतात. आपल्या आकाशगंगेत डझनभर ब्लॅक होल असून त्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 10 पट आहे. परंतु आता सापडलेला बीएच3 ब्लॅकहोल सर्वात मोठा आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या जिया स्पेस ऑब्झर्व्हेटरीने बीएच3 ब्लॅकहोलचा शोध लावला आहे.
शेअर बाजार गडगडला
इराण-इस्रायलमधील तणावाचा परिणाम अवघ्या जगावर होत असून युद्धसदृश परिस्थितीमुळे आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजार गडगडला. आज सलग दुसऱया दिवशीही शेअर बाजारात मोठी घसरण दिसली. बाजारात अक्षरशः दाणादाण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे 4500 तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे 140 अंकांनी घसरला आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 500 अंकांच्या घसरणीसह 72906 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 140 अंकांच्या घसरणीसह 22135 अंकांवर स्थिरावला.
रुपयाची घसरगुंडी…
आखातातील युद्ध भडकण्याची भीती असल्याने भांडवली बाजारात मोठी पडझड झाली. भारतीय चलन अर्थात रुपयाच्या मूल्यावर याचा परिणाम दिसून आला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात 9 पैशांची घसरण झाली आणि तो 83.53 रुपये प्रतिडॉलर या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. याआधी 22 मार्च 2024 रोजी रुपयाने डॉलरच्या तुलनेत 83.45 ही नीचांकी पातळी गाठली होती. दरम्यान, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे अमेरिकन डॉलरला पाठिंबा मिळत आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने डॉलर मजबूत होत आहे.
चांद्रयान-4 ची तयारी
चांद्रयान-3च्या यशस्वी मोहिमेनंतर चांद्रयान-4ची जोरदार तयारी सुरू झाली आहे. इस्रो अर्थात हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था ही तयारी करत असून इस्रो लँडर आणि जपान रोव्हर तयार करणार आहे. इस्रो आणि जपान एअरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सी या अंतराळ संशोधन संस्था संयुक्तपणे ही मोहीम राबवणार आहेत. चांद्रयान-4 या मोहिमेचे नाव लुपेक्स असे ठरवले असून या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावरील पाण्याच्या साठय़ांचा शोध घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर चंद्रावरील मातीचे, खडकांचे नमुने पृथ्वीवर आणण्यात येणार आहेत.
जास्त झोप ही धोक्याची घंटा
शरीराला झोपेची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आवश्यकतेपेक्षा जास्त झोपल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. संशोधनातून असे निदर्शनास आले की, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा आणि झोपेसारखी लक्षणे दिसून येतात. व्हिटॅमिन डी शरीरातील पॅल्शिअम आणि फॉस्फरस शोषून घेते. तसेच मेटाबॉलिज्म कमी होऊ लागते आणि रोगप्रतिकारशक्तीदेखील हळूहळू कमकुवत होते. यावर उपाय म्हणून सोयाबीन, दही, दूध, चीज, ओट्स आणि अंडी यांचा समावेश आहारात करावा, असा डॉक्टरांनी दिला.
3500 फुलांपासून साकारले प्रभू श्रीराम
रामनवमीनिमित्त पवई येथील सात वर्षीय आयुष कांबळे या बालकलाकाराने प्रभू श्री रामाचे मोझॅक पोर्ट्रेट साकारलेय. यासाठी त्याने सहा रंगाच्या 3,500 आर्टिफीशियल फुलांचा वापर केला आहे. तीन फूट लांब आणि चार फूट रुंदीचे पोर्ट्रेट साकारण्यासाठी त्याला 12 तासांचा कालावधी लागला असून या पोर्ट्रेटची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये केली आहे. आयुष हा पवईच्या इंग्लिश हायस्कूलमधील पहिलीचा विद्यार्थी आहे, वयाच्या साडेचार वर्षांपासून तो मोझॅक पोर्ट्रेट साकारतोय.