बीसीसीआयने काढली अय्यर, किशनची विकेट, देशांतर्गत क्रिकेट न खेळल्याची दोघांना शिक्षा

देशांतर्गत क्रिकेट न खेळल्याची शिक्षा देताना बीसीसीआयने हिंदुस्थानी क्रिकेटपटूंच्या 2023-24 सालच्या वार्षिक कराराच्या यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशन या गुणवान युवा क्रिकेटपटूंना डच्चू देत त्यांची विकेट काढली आहे. मात्र हिंदुस्थानी संघात जोरदार कामगिरी करणाऱया यशस्वी जैसवाल, रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिष्णोई, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, रजत पाटीदार या खेळाडूंना करारबद्ध करत त्यांना मोठी भेट दिली आहे.

बीसीसीआयने करारबद्ध खेळाडूंची यादी वाढवली

गतवर्षी बीसीसीआयने 26 खेळाडूंशी करार केला होता. यंदा ही यादी 30 खेळाडूंची केली आहे. एवढेच नव्हे तर यात चक्क 11 नव्या खेळाडूंना करारबद्ध केले आहे. तसेच ध्रुव जुरेल आणि सरफराज खान ही दोन नावेसुद्धा यात जोडली जाणार आहे. त्यामुळे नवी करारबद्ध यादी 32 खेळाडूंची होईल

ए प्लसची फॅब फोर कायम

हिंदुस्थानी क्रिकेटचा आधारस्तंभ असलेला विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जाडेजा या चौघांनाही बीसीसीआयने ‘ए प्लस’ श्रेणीत कायम ठेवले आहे, मात्र नव्या यादीतील कुणालाही यात स्थान दिलेले नाही.

यांना मिळाले प्रमोशन

हिंदुस्थानी संघासाठी गेले वर्षभर धावांचा पाऊस पाडणाऱया शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि के. एल. राहुल या तिघांना ‘ए’ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. हे तिघेही या आधी ‘बी’ श्रेणीत होते. तसेच सध्या इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस पाडणाऱया यशस्वी जैसवालला थेट ‘बी’ श्रेणीत एण्ट्री देण्यात आली आहे.

यांची घसरली श्रेणी

हिंदुस्थानचा यष्टिरक्षक ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाल्यानंतर गेले चौदा महिने संघाबाहेर आहे. गेल्या वर्षी तो ‘अ’ श्रेणीत होता, पण तो वर्षभर खेळू न शकल्यामुळे त्याला आता ‘ब’ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. तसेच अक्षर पटेलही ‘ए’ वरून ‘बी’मध्ये आला आहे. या यादीत सूर्यकुमार यादव हाच कायम राहिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

हे झाले करारमुक्त

बीसीसीआयने आपल्या नव्या करारबद्ध यादीत युवा खेळाडूंचे नाव जोडले असले तरी गेल्या वर्षीच्या यादीतील चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, शिखर धवन, दीपक हुडा आणि युझवेंद्र चहल यांना वगळले आहे.

11 नवे खेळाडू करारबद्ध

बीसीसीआयने आपल्या 2023-24 सालच्या वार्षिक करारात एकूण नव्या 11 खेळाडूंना स्थान दिले आहे. यात यशस्वी जैसवालचे नाव सर्वात वर आहेच, पण त्याचबरोबर रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिष्णोई, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, रजत पाटीदार या नव्या खेळाडूंशी करार केले आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे रजत पाटीदार आपल्या पदार्पणात अपयशी ठरला असला तरी त्याला करारबद्ध करून त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.

सरफराज आणि जुरेलसुद्धा यादीत

बीसीसीआयच्या नियमानुसार किमान 3 कसोटी किंवा 8 वन डे किंवा 10 टी-20 सामने खेळलेल्या खेळाडूशीच करार केला जातो. त्यामुळे ध्रुव जुरेल आणि सरफराज खान हे केवळ दोन कसोटी खेळलेले खेळाडू धर्मशाळा कसोटीनंतर ‘क’ श्रेणीत आपोआप सामावले जातील, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

नव्या पाच वेगवान गोलंदाजांशीही करार करण्याची शिफारस

निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरने आकाश दीप, विजयकुमार विशाख, उमरान मलिक, यश दयाल आणि व्ही. कावेरप्पा या पाच वेगवान गोलंदाजांनाही करारबद्ध करावे, अशी शिफारस बीसीसीआयकडे केली आहे.

2023-24 सालासाठी बीसीसीआयने करारबद्ध केलेले क्रिकेटपटू

ए प्लस श्रेणी ः रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा.

ए श्रेणी ः आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, के. एल. राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पंडय़ा.

बी श्रेणी ः सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैसवाल.

सी श्रेणी ः रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिष्णोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, के. एस. भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

अय्यर-किशनवर कठोर कारवाई

श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱया कसोटीत खेळला होता. त्यानंतर फिटनेस नसल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली होती आणि त्यानंतर तो फिट असल्याचे जाहीर करून त्याला रणजीत खेळण्याचा सल्ला दिला होता. तसाच सल्ला इशान किशनलाही देण्यात आला होता, पण या दोघांनीही तो पाळला नसल्याचे बीसीसीआयकडून कळले आहे. त्यामुळे या दोघांनाही थेट करारातून काढण्याची कठोर कारवाई बीसीसीआयने केली आहे. त्यामुळे या दोघांना करारातूनच काढण्याची कारवाई जरा अधिक कठोर असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.