विश्रांतीगृहे, स्वच्छतागृहांची सुधारणा करणार, मंत्री दादा भुसे यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विश्रांतीगृहे, स्वच्छतागृहांची सुधारणा करणार

महाराष्ट्र राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या राज्यातील विविध बसस्थानकांवर बस चालक आणि वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहांमध्ये स्वच्छता आणि सुधारणा करण्याबाबत तातडीने संबंधितांना सूचना देण्यात येतील, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली. विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाई जगताप, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, सतेज पाटील, मनीषा कायंदे, उमा खापरे यांनी सहभाग घेतला.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागा भरणार

अनुसूचित जमाती प्रवर्गातून नेमणूक होऊन शासकीय अधिकारी, कर्मचारी अनेक वर्षे कार्यरत होते. मात्र जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना अधिसंख्य पदावर नेमण्यात आले आहे. या नेमणुकीनंतर रिक्त झालेल्या जागा लवकरच भरण्यात येतील, अशी माहिती पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना अधिसंख्य पदाचा पदभार दिल्यासंबंधी सदस्य आमश्या पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

नाटू… नाटूचे अभिनंदन 

‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू… नाटू’ या गाण्याला ऑस्कर मिळाल्याबद्दल उपसभापती नीलम गोऱहे यांनी सभागृहात अभिनंदन प्रस्ताव मांडला. त्याला सर्व सभासदांनी पाठिंबा दिला. यावेळी गोऱहे यांनी ‘नाटू… नाटू’ या गाण्याच्या पार्श्वभूमीवर आणि गाण्याचा मराठीतला अर्थ समजावून सांगत हिंदुस्थानच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीला मिळालेला हा पुरस्कार असल्याचे अभिनंदन प्रस्तावात म्हटले.

बिल भरण्याच्या बनावट मेसेजप्रकरणी 95 गुन्हे

ऑनलाईन वीज बिल भरण्यासाठी बनावट मेसेजद्वारे महावितरणच्या वीज ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल राज्यात 95 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

बनावट मेसेजद्वारे महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक होत असल्याबद्दल प्रशांत बंब यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर महावितरणसोबत अदानी, टाटा पॉवर, बेस्टच्या ग्राहकांनाही अशा प्रकारचे बनावट मेसेज करण्यात येत आहे. अशा बनावट मेसेजना ग्राहकांनी प्रतिसाद देऊ नये. दरम्यान, महावितरणचा कोणताही डेटा लीक झालेला नाही, असे स्पष्टीकरण यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुंबई विद्यापीठाचा बृहत आराखडा अंतिम करणार

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी प्राप्त सूचना व सुधारणा यांचा विचार करून सल्लागारामार्फत संकल्पनात्मक बृहत आराखडा प्राधिकरणाला दोन पर्यायांसह सादर करण्यात आला आहे. लवकरच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मुंबई विद्यापीठामार्फत संकल्पचित्र तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचा आराखडा तयार करण्यास विलंब होत असल्याबाबत सदस्य सुनील शिंदे, विलास पोतनीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

‘नासा’च्या नावाने पुण्यात 6 कोटींची फसवणूक

अमेरिकेतील ‘नासा’ या अंतराळ संशोधन केंद्राच्या नावाने पुण्यातील शेकडो लोकांची 6 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये चार जणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यात नासाच्या नावाने अनेकांची फसवणूक केल्याच्या संदर्भात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न विचारला होता. राईस पुलर या यंत्रामधून होणाऱया रेडिएशनच्या उपयुक्ततेमुळे नासा या संशोधन संस्थेकडून मोठी रक्कम मंजूर झाली असून त्यापैकी काही रक्कम विनापरतावा असुरक्षित कर्ज स्वरूपात वाटप करायची असल्याचा आभास निर्माण केला.