
न्यूजक्लिक नावाच्या एका संकेतस्थळाच्या कार्यालयावर आणि ही संकेतस्थळ चालवणाऱ्या प्रवर्तकांवर अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी केली आहे. दक्षिण दिल्लीतील सैदुलाजाब, गुरुग्रामसह एकूण 8 जागी ही छापेमारी करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा आधार घेत संचलनालयाने ही छापेमारी केली आहे. संकेतस्थळांच्या संघटनेनं या छापेमारीबद्दल नाराजी व्यक्त करत हा माध्यमांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे.
परदेशातून मिळालेला पैसा, 2 वर्षांपूर्वी बंद पडलेल्या कंपनीसोबत झालेला 30 कोटींचा व्यवहार याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अंमलवजावणी संचलनालयाच्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ताही असल्याचं कळते आहे. या संकेतस्थळाचे संस्थापक प्रबीर पूरकायस्थ असून संपादक प्रांजल पांडे आहेत.
न्यूजक्लिकने या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की हे संकेतस्थळ एक स्वतंत्र विचारांचे आहे. हे संकेतस्थळ प्रगतीशील आंदोलनांचे पुरस्कार करणारे असून देशविदेशातील घडामोडी लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत असते. असं म्हटलं जातं की हे संकेतस्थळ डाव्या विचारांचा पुरस्कार करणारे आहे.या संकेतस्थळाचे संपादक प्रांजल पांडे म्हणाले की मंगळवारी सकाळपासूनच छापेमारीला सुरुवात झाली होती. आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करत असून छापेमारी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मिळतील ती सगळी कागदपत्र खंगाळून काढली आहेत.



























































