पुढला साथरोग येण्याच्या मार्गावर! ब्रिटीश शास्त्रज्ञाचा इशारा

ब्रिटनचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार सर पॅट्रिक व्हॅलेन्स यांनी इशारा दिला आहे की, ‘आणखी एक साथरोग येण्याच्या मार्गावर आहे आणि सरकारने तो रोखण्यासाठीच्या तयारीला प्राधान्य देणं आवश्यक आहे’.  ‘द गार्डियन’नं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

व्हॅलेन्सच्या म्हणण्यानुसार, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुढले धोके आधीच ओळखून ते रोखण्यासाठी ‘चांगली नजर ठेवणे, योग्य पावलं उचलणे’ अशा गोष्टी आवश्यक आहेत.

व्हॅलेन्सचा विश्वास आहे की आता रोगाचे निदान करण्याची सहज उपलब्धता, लस आणि उपचारांमुळे साथीच्या आजारादरम्यान कठोर उपायांची आवश्यकता आधीच टाळता येईल. तसेच या सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण ‘आंतरराष्ट्रीय समन्वय’ आवश्यक आहे, असं त्यांनी सावध केलं.

द गार्डियनच्या वृत्तानुसार; ते म्हणाले की 2021 मध्ये G7 कार्यक्रमादरम्यान त्यांनी मांडलेले मुद्दे 2023 पर्यंत विस्मृतीत जातील. मात्र हे विसरून चालणार नाही कारण येणाऱ्या साथरोगाला तोंड देण्यासाठी संपूर्ण जगाला एकप्रकारे सशस्त्र दलाप्रमाणे तयारी करावी लागेल.

‘एखाद्या राष्ट्राकडे केवळ या वर्षी युद्ध होणार आहे म्हणून सैन्य असणे आवश्यक आहे असं नाही, तर आपल्याला माहित आहे की एक राष्ट्र म्हणून आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींचा तो एक महत्त्वाचा भाग आहे’, असं ते म्हणाले. ‘अगदी अशीच सज्जता ठेवून तशाच प्रकारे वागण्याची गरज आहे आणि साथीच्या रोगाचे कोणतेही चिन्ह नाही म्हणून त्याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही’, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.