समाजसेवक महिलेला अश्लील मेसेज पाठवणारे दोघे अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mobile-phone

सामाजिक संस्था चालविणाऱ्या महिलेपासून दुरावा झाल्याने त्या मॅडमच्या पुन्हा गुड बुकमध्ये येण्यासाठी एका 60 वर्षीय वृद्धाने केलेली आयडियाची कल्पना त्याच्या अंगलट आली आहे. मॅडमने पुन्हा आपल्याशी पहिल्यासारखे बोलावे यासाठी वृद्धाने मित्राकरवी तिला अश्लील मेसेज तसेच संभाषण करण्यास सुरुवात केली. पण हे प्रकरण उलटले आणि तो गजाआड गेला.

एका अज्ञात मोबाईल नंबरवरून अश्लील मेसेज येत असून अज्ञात व्यक्ती अश्लील भाषेत बोलतो अशी तक्रार एका समाजसेवक महिलेने वि. प. रोड पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांच्या मार्गदर्शनाखाला समांतर तपास सुरू केला.

तांत्रिक बाबींचा अभ्यास करून पोलिसांनी त्या महिलेला नाहक त्रास देणाऱया नौशाद उस्मान पटेल (60) आणि मोहम्मद अन्वर मो.इसाक शेख (57) या दोघांना पकडले. त्या महिलेसोबत पटेल काम करतो. पण मॅडमसोबत दुरावा झाल्याने पुन्हा मॅडमबरोबर चांगले संबंध निर्माण व्हावेत यासाठी पटेलने ही आयडिया केली होती. त्याने अन्वरला सांगून मॅडम तसेच स्वतः निनावी कॉल करून अश्लील भाषेत बोलण्यास सांगितले होते.