‘नीट’ परीक्षा शुल्कात वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर घेण्यात येणाऱया ‘नीट’ परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. नीट परीक्षा देणाऱया खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दीड हजार तर एससी-एसटी, दिव्यांग आणि तृतीयपंथी विद्यार्थ्यांना 800 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना सेवाशुल्क आणि जीएसटीदेखील लागू असणार आहे.

राष्ट्रीय चाचणी संस्थेने वर्ष 2020 मध्ये होणाऱया नीट परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ईडब्लूएस आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 1400 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. गेल्या वर्षी खुल्या प्रवर्गासाठी 1400 रुपये परीक्षा शुल्क होते, तर आरक्षित प्रवर्गासाठी 750 रुपये शुल्क होते.

1 ते 31 जानेवारी 2020 पर्यंत परीक्षा अर्जातील चुका दुरुस्तीसाठी मुदत. ‘नीट’ परीक्षेला बुरखा, हिजाब घालण्याची परवानगी. अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात एक तास आधी उपस्थित रहावे. हिंदीसोबतच इंग्रजी, मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, उडिया, तमीळ, तेलुगू, उर्दू भाषेत परीक्षा देता येणार.

3 मार्चला ‘नीट’ परीक्षा; 31 डिसेंबरपर्यंत नोंदणी 

3 मार्च 2020 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत नीट परीक्षा होणार असून या परीक्षेसाठी नावनोंदणीची प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. https://ntaneet.nic.in या वेबसाइटवर नोंदणी करता येणार आहे. नावनोंदणी करणाऱया विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्रीसह बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्लिश या विषयांत एकत्रित 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. आरक्षित वर्गांसाठी गुणांची अट 40 टक्के आहे. बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थीही ‘नीट’ परीक्षेला बसू शकतात.