
जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानने तिसरे सुवर्ण जिंकत इतिहास रचला. हिंदुस्थानच्या 26 वर्षीय स्टार बॉक्सर निकहत झरीनने 50 किलो वजनी गटात व्हिएतनामच्या एनगुएन थि तामचा 5-0 असा दणदणीत पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. हे तिचे दुसरे जगज्जेतेपद आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या स्पर्धेतही तिने सोनेरी कामगिरी केली होती. जागतिक महिला बॉक्सिंगमध्ये दोन जगज्जेतेपद पटकावणारी निकहत ही हिंदुस्थानची दुसरी महिला बॉक्सर ठरली आहे.
अंतिम सामन्यात झरीन आणि एनगुएन थि ताम यांच्यात चुरस पहायला मिळली. व्हिएतनामी बॉक्सरने दुसर्या राऊंडमध्ये निकहतला कडवी टक्कर दिली. अंतिम फेरीही अटीतटीची झाली. मात्र त्यात निकहतने जोरदार खेळ करीत सामन्यावर आपला कब्जा केला.
निकहतच्या आधी काल या स्पर्धेत नीतू घंघास आणि स्वीटी बूरा यांनी सुवर्णपदके जिंकली होती. त्यानंतर आता 26 वर्षीय निकहतने सुवर्णपदकावर कब्जा करत सोनेरी हॅटट्रिक केली. गतवर्षीही निकहतने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. या स्पर्धेत मेरी कोमने तब्बल सहा सुवर्णपदके पटकावली होती, तर सरिता देवी, जेनी आरएल, लेखा केसी यांनी एकेकदा सुवर्णपदक पटकावले आहे.

























































