मराठी भाषा अभ्यासक्रमाची सांगड शालेय अभ्यासक्रमाशी घाला, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचारासाठी साहित्य संघामार्फत चालवण्यात येणाऱया मराठी भाषा अभ्यासक्रमाची सांगड शालेय अभ्यासक्रमाशी घालण्यात यावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत.

राज्यातील सर्व शिक्षण मंडळाच्या शालेय अभ्यासक्रमात मराठी विषय अनिवार्य करण्याकरिता मराठी शिक्षण अधिनियम करण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे तसेच विविध संघटनांनी सातत्याने आग्रह धरलेला होता. डॉ. गोऱ्हे या मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत शालेय शिक्षण विभाग तसेच मराठी भाषा विभाग यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. याच अनुषंगाने उपसभापती दालनात बैठक संपन्न झाली. राज्य मराठी विकास संस्थेकडील भाषा तज्ञांना मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबतच्या कायद्याचा मसुदा देऊन त्यांचा अभिप्राय घेणे, मराठी शब्दांची संख्या विकिपीडियावर वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत असे निर्देश गोऱ्हे यांनी दिले. या बैठकीला समिती सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, लक्ष्मीकांत देशमुख, नागनाथ कोत्तापल्ले, चंद्रशेखर गोखले, रमेश कीर, मराठी भाषा सहसचिव खरात, अवर सचिव नंदा राऊत उपस्थित होते.