
देशाची राजधानी दिल्ली आज भीषण स्फोटाने हादरली. लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या भयानक आगीत चार ते पाच गाड्या जळून खाक झाल्या. यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 24 हून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर चांदणी चौक बंद करण्यात आला असून दिल्लीत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईतही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळ धावत्या कारमध्ये स्फोट झाला. सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हा स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की काही क्षणातच तिथे आगीचे लोळ उठले. या आगीत चार ते पाच गाड्या जळून खाक झाल्या. काही इमारतींच्या काचा फुटल्या. त्यामुळे प्रचंड घबराट उडाली.
एका दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, आयुष्यात कधी असा स्फोट आणि इतका मोठा आवाज ऐकला नव्हता. स्फोटानंतरच्या हादऱ्याने मी खुर्चीवरून पडलो. क्षणभर वाटलं की धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेतेय. मृत्यूच्या दारातून बाहेर आल्यासारखे वाटले.
सहा कार आणि तीन रिक्षा खाक
ज्या कारमध्ये स्फोट झाला ती स्विफ्ट डिझायर कार होती, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. स्फोटात सहा कार, दोन ई-रिक्षा आणि एक ऑटो रिक्षा जळून खाक झाली.
800 मीटरवरची इमारत हादरली
चांदणी चौक ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय भार्गव म्हणाले, माझे दुकान स्फोटाच्या ठिकाणापासून 800 मीटरवर असलेल्या इमारतीत आहे. स्फोटामुळे या इमारतीसही हादरे बसले.
सर्व शक्यतांचा तपास सुरू – अमित शहा
स्फोटांचा तपास एनआयए, एनएसजी आणि फॉरेन्सिक टीम संयुक्तपणे करत आहे. सर्व शक्यतांची चाचपणी केली जात आहे. सर्व पर्याय तपासले जात आहेत. परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासातून जे काही समोर येईल, ते जनतेसमोर ठेवले जाईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिली. ‘‘लाल किल्ल्याजवळच्या सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर एका ह्युंडाई आय-20 कारमध्ये हा स्फोट झाला,’’ असेही शहा यांनी सांगितले.
नरेंद्र मोदींनी घेतला परिस्थितीचा आढावा
स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. या स्फोटात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.
अत्यंत दुःखद घटना – राहुल गांधी
या घटनेबद्दल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र दुःख आणि चिंता व्यक्त केली. ‘‘या अपघातात अनेक निष्पाप जीव गेले. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे’’ असे त्यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे.
शरीराचे तुकडे विखुरले
स्फोट एवढा भयंकर होता की निष्पाप नागरिकांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. घटनास्थळी कुणाचे हात, कुणाचे पाय, बोटे तुटून दूरवर जाऊन पडली होती. काही मृतदेह गाड्यांच्या टपावर आढळून आले. चांदणी चौक ट्रेडर्स असोसिएशनने याबाबत एक व्हिडीओ जारी केला असून, त्यात स्फोटाची भीषणता लक्षात येते.
ही घटना धक्कादायक – आदित्य ठाकरे
लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट खरोखरच धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ’एक्स’ पोस्टच्या माध्यमातून दिली. या भयंकर स्फोटात जीव गमवाव्या लागलेल्या निष्पाप नागरिकांबद्दल शोक व्यक्त करतानाच स्फोटात जखमी झालेले सर्वजण लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
व्हाइट कॉलर टेरर मॉड्युलशी संबंध?
हरयाणा पोलिसांनी जम्मू-कश्मीर पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करत आज ‘व्हाइट कॉलर टेरर मॉड्युल’चा पर्दाफाश केला. तीन कश्मिरी डॉक्टरांसह 8 जणांना अटक केली. त्याचबरोबर फरिदाबाद येथील एका घरातून 2,900 किलो स्फोटके जप्त केली. त्यात 260 किलो अमोनियम नायट्रेट असल्याचे बोलले जाते. याशिवाय, एके-47 रायफलसह शस्त्रांचा मोठा साठाही ताब्यात घेतला. आजच्या स्फोटाचा या व्हाइट कॉलर टेरर मॉड्युलशी नेमका काय संबंध आहे, याचा तपास केला जात आहे.
अपघात की घातपात?
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून या घटनेची माहिती घेत आहेत. सुभाष रोडवर ही घटना घडली. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून हा संपूर्ण परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला असून कसून तपास सुरू आहे. हा दहशतवादी हल्ला होता की अपघात होता हे कळू शकलेले नाही. एनआयएचे पथकही दाखल झाले आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुरुग्राममधून सलमान नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ज्या कारमध्ये स्फोट झाला ती त्याच्या नावावर आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
मुंबईत कसून तपासणी
दिल्लीतील घटनेनंतर महाराष्ट्र पोलीस हाय अलर्ट झाले आहेत. सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. मुंबई पोलीसदेखील सुरक्षेची विशेष काळजी घेत आहेत. आम्ही अलर्ट आहोतच, पण नागरिकांनीदेखील जागृत राहावे. काही संशयास्पद दिसल्यास तत्काळ पोलिसांना किंवा 100/112 या क्रमांकावर संपर्क करा. कुठल्याही अनोळखी वस्तूंना हात लावू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुंबईतील ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा महत्त्वाच्या ठिकाणी कसून तपासणी सुरू आहे.



























































