
परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी आणि रियल इस्टेट क्षेत्राला पुनरुज्जीवीत करण्यासाठी कर्ज पुनर्रचना, सरकारकडून जमिनीची स्वस्तात उपलब्धता तसेच विकास आणि स्टॅम्प डय़ुटी शुल्कात घट आदी बाबींची आवश्यकता असल्याचे मत ‘हिरानंदानी डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘नरेडको’चे अध्यक्ष डॉ निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केले.
कोरोनाचा मोठा फटका देशातील रियल इस्टेट क्षेत्राला बसला आहे. त्यातच बँका आणि बॅंकेतर वित्तीय संस्थांनी या क्षेत्राला अर्थपुरवठा करण्यावर अधिक निर्बंध आणले आहेत. या पार्श्वभूमीवर ’देशाच्या रियल इस्टेट क्षेत्राची सद्यस्थिती आणि भविष्य’ या विषयावर ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने नुकतेच वेबिनारचे आयोजन वेले होते. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. हिरानंदानी पुढे म्हणाले, चीन, सिंगापूर किंवा दुबई अशी जगातील कोणतीही अर्थव्यवस्था असो. सरकारकडून पायाभूत सुविधा, बांधकाम व्यवसायाला भरीव आर्थिक सहाय्य मिळाल्याशिवाय तेथील सकल राष्ट्रीय उत्पन्न दोन आकडी वृद्धी गाठू शकत नाही. एकवेळच्या ‘फंड रोलओव्हर’चा प्रस्ताव मान्य झाल्यास गृहनिर्माण क्षेत्रासाठी ही नक्कीच दिलासादायक बाब ठरेल.’ यावेळी ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मु. मोहन यांच्यासह 100 हून अधिक बांधकाम व्यावसायिक हजर होते.


























































