
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे. 22 जानेवारीला चारही आरोपींना फासावर लटकावलं जाणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. मात्र या आरोपींनी फाशीपासून बचाव व्हावा यासाठी अखेरचा मार्ग अवलंबला आहे. चार आरोपींपैकी विनय शर्मा नावाच्या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह याचिका म्हणजेच सुधारणा याचिका दाखल केली आहे. विनय शर्मा याने फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणण्याचीही मागणी केली आहे. अक्षय आणि पवन हे दोन्ही आरोपीही सुधारणा याचिका दाखल करणार असल्याचं त्यांचे वकील एपी सिंह यांनी सांगितले आहे. दाखल झालेल्या याचिकेमुळे आणि दाखल होणाऱ्या याचिकांमुळे 22 तारखेला आरोपींना फासावर लटकावले जाईल का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
गेली सात वर्ष निर्भयाच्या मारेकऱ्यांविरूद्ध खटला चालण्यात येत आहे. मंगळवारी म्हणजे 7 जानेवारी रोजी पटियाला न्यायालयाने चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी करण्यात आला होता. या शिक्षेपासून सुटका व्हावी यासाठी आरोपी शेवटपर्यंत प्रयत्न चालू ठेवणार असं दिसतंय.
सुधारणा याचिका ( Curetive Petition ) क्युरेटीव्ह याचिका म्हणजे काय ?
दोषी आरोपी शिक्षेपासून दिलासा मिळावा यासाठी जो शेवटचा उपचार करण्याचा प्रयत्न करतो त्याला क्युरेटीव्ह याचिका म्हणतात. या याचिकेमध्ये आरोपीकडून शिक्षा कमी केली जावी अशी मागणी केली जाते. म्हणजे फाशीऐवजी जन्मठेप दिली जावी अशी मागणी आरोपींकडून केली जात असते. ही याचिका दाखल केली जात असताना दोषी सर्वोच्च न्यायालयाच्या फाशीच्या आदेशाला का आव्हान देत आहे याची कारणमीमांसा त्याच्या वकिलांना न्यायालयात करावी लागते. ही याचिका सर्वोच्च न्यायालयच्या तीन वरिष्ठ न्यायमूर्तींपुढे सुनावणीसाठी वर्ग करण्यात येत असते.
2002 साली रुपा हुर्रा विरूद्ध अशोक हुर्रा प्रकरणानंतर क्युरेटीव्ही याचिकेची परंपरा देशात सुरू झाली. हे प्रकरण घटस्फोटाचं प्रकरण होतं. या प्रकरणात पती आणि पत्नीने सहमतीने घटस्फोट घेण्याचं ठरवलं होतं, ऐनवेळी पत्नीने माघार घेतली आणि प्रकरण न्यायालयात पोहोचलं. या प्रकरणामध्ये घटस्फोटाच्या वैधतेबाबत प्रश्न निर्माण झाले होते. हे सोडवत असताना न्यायालयापुढे मुद्दा उपस्थित झाला होता की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही आरोपीला दिलासा मिळण्यासाठी काही मार्ग शिल्लक असतो का ? यावर क्युरेटीव्ह याचिकेची मात्रा शोधून काढण्यात आली.
























































