अब्रुनुकसानीच्या खटल्यात दणका; नितेश राणे अखेर कोर्टापुढे शरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्च न्यायालयाने दणका देताच अब्रुनुकसानीच्या खटल्यात भाजप आमदार नितेश राणे अखेर सोमवारी माझगाव न्यायालयापुढे शरण आले. समन्स व वॉरंट बजावल्यानंतरही त्यांनी न्यायालयात हजर राहायला टाळाटाळ केली होती. न्यायालयीन आदेश न जुमानण्याच्या या प्रवृत्तीला चांगलाच दणका देत दंडाधिकाऱयांनी नितेश राणेंना 100 रुपयांचा दंडही ठोठावला. तसेच 13 मार्चच्या पुढील सुनावणीवेळी व्यक्तिशः हजर राहण्याची सक्त ताकीद दिली.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी नितेश राणेंविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात माझगाव न्यायालयाने अजामीनपत्र वॉरंट बजावताच नितेश राणे यांनी अटक टाळण्यासाठी आधी सत्र व नंतर उच्च न्यायालयात धावाधाव केली. उच्च न्यायालयाने पाच दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाच्या वॉरंटला न जुमानणाऱया नितेश राणेंना अटक टाळण्यासाठी न्यायालयापुढे शरण येणे भाग पडले.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचे वकील मनोज पिंगळे यांनी नितेश राणेंना दंड ठोठावण्याची विनंती न्यायालयाला केली. अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर नितेश राणेंनी सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज केला. तेथे वॉरंटला स्थगिती मिळाली नव्हती, तरीही त्यांनी हजर राहायला टाळाटाळ केली. याकडे अॅड. पिंगळे यांनी लक्ष वेधले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने नितेश राणेंना 100 रुपयांच्या दंडाचा दणका दिला.