
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे 69 गावे पाणी पुरवठा योजनेला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ विधिमंडळाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मंगळवारी उपोषण करणार आहेत. त्यांनी स्वत:या बाबतची माहिती दिली आहे. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील कामांना उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्थगिती देण्याचे गलिच्छ राजकारण करत आहेत. असा आरोप नितीन देशमुख यांनी केला.
ते म्हणाले की माझ्या अकोला-बाळापूर मतदार संघातील 69 गावातील लोकांसाठी पाण्यासाठी आरक्षण देण्यात आलं होतं. ते या सरकारने आता मागे घेतलं आहे. त्यामुळे माझ्या मतदार संघावर अन्याय करण्याचं काम हे सरकार करत आहे. लहान मुलांनाही खारं पाणी प्यावं लागत आहेत. हे ठरवून घडवून आणण्यात आलं आहे.”
वानमधून शेगाव, जळगाव जामोद येथेही पाणी पुरवठा होतो. मात्र, त्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत, बाळापूर येथे मात्र शिवसेनेचा आमदार असल्याने भाजप विरोध करीत आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेलाच स्थगिती देत ग्रामस्थांना तहानलेले ठेवण्यात येत आहे, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला.





























































