
सामना ऑनलाईन । सोलापूर
एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी मिळून महाराष्ट्राची पार वाट लावून टाकली, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नागपूरमधील उमेदवार नितीन गडकरी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव न घेता गडकरी यांनी आघाडीवर शरसंधान साधले.
सोलापूर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी सोलापूरातील पार्क मैदानावर आयोजित प्रचारसभेत गडकरी बोलत होते. यावेळी मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या कामांबद्दलही गडकरींनी सांगितले. दरम्यान, जे आपल्या आयुष्यात कुठलेही चांगले काम करू शकत नाहीत ते जातीयवादाचे विष पसरवत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन घटना बदलण्याचे खोटे आश्वासन दिले जात आहे. फुले-शाहूंचे नाव घेऊन आपली घरे भरण्याचे कामही ते करत आहेत, असा आरोप नितीन गडकरी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केला.
काँग्रेसने नेते, कार्यकर्त्यांची गरिबी हटवली
काँग्रेसने मुस्लिम, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजुरांची गरिबी हटवली का, असा सवाल करतानाच काँग्रेसने केवळ त्यांचे नेते, कार्यकर्ते आणि चेल्याचपाटय़ांची गरिबी हटवली अशी टीकाही गडकरी यांनी यावेळी केली. दरम्यान, राजकारण हा आमचा धंदा नसून ते राष्ट्रनिर्माणाचे एक प्रभावी उपकरण आहे असे सांगतानाच काँग्रेसची अवस्था मात्र ‘दिल के टुकडे हुए हजार, एक यहा गिरा एक वहा गिरा’ अशी झाली आहे. काँग्रेसचा गेल्या 70 वर्षांचा इतिहास हा बेईमानी आणि गद्दारीचा इतिहास आहे, अशी बोचरी टीकाही गडकरी यांनी काँग्रेसवर केली.



























































