पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आगामी निवडणुकीत भाजपलाच पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील असे सांगत आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज स्पष्ट केले. राजकीय आयुष्यात मला योग्यतेपेक्षा जास्त मिळाल्याने मी कोणत्याही शर्यतीत नाही, असे ते म्हणाले.

मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका न्यूज वेबसाईटने गडकरी यांची मुलाखत घेतली. येत्या निवडणुकीत भाजपला पुन्हा बहुमत मिळाले तर पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून गडकरी यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी, आपण मंत्री म्हणून खूप समाधानी असून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरण्याची आपली इच्छा नसल्याचे सांगितले.

केंद्रीय मंत्र्यांवर नरेंद्र मोदी यांचे दडपण असते का, या प्रश्नाला गडकरी यांनी नकारार्थी उत्तर दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी हे प्रत्येक मंत्र्याला बोलू देतात, त्यांचे ऐकतात आणि अनेकदा मंत्र्यांनी मोदींच्या मतांशी असहमती दर्शवली तरी त्यांना कोणत्याही नाराजीचा सामना करावा लागत नाही, असे गडकरी म्हणाले. आपणसुध्दा अनेक वेळा मोदींच्या मतावर असहमती दर्शवली असल्याचे ते म्हणाले.

‘अच्छे दिन’ व्यक्तीनिहाय बदलतात
मोदी सरकारच्या आजवरच्या कारकीर्दीत देशात अच्छे दिन आलेत का? या प्रश्नालाही गडकरी यांना या मुलाखतीत सामोरे जावे लागले. त्यावर ‘अच्छे दिन’ ही संकल्पना व्यक्तीनिहाय बदलत असते आणि प्रत्येकाचा त्याबद्दलचा स्वतःचा दृष्टिकोन आहे असे उत्तर त्यांनी दिले. मागील सरकारचा कारभार आणि विद्यमान सरकारची कामगिरी यांची तुलना केली तर त्यातील फरक सहज लक्षात येतील असे ते म्हणाले.