संकटाला भिडणार; महागडी वीज खरेदी केली तरी दरवाढ करणार नाही; नितीन राऊत यांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

भाजपचे सरकार असलेल्या गोवा व गुजरातमध्ये विजेचे अतिरिक्त उत्पादन आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांना कोळसा मिळत आहे, त्यातून अतिरिक्त वीजनिर्मिती होत आहे. त्यामुळे बिगर भाजपशासित राज्यांना सहकार्य करू नये हे केंद्राचे धोरण आहे, असा घणाघाती आरोप राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला. महागडी वीज विकत घेतली तरी राज्यात वीज दरवाढ होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील कोळशाचा तुटवडा आणि परिणामी निर्माण झालेले विजेचे संकट, केंद्राची भूमिका अशा विविध विषयांवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संवाद साधला.

गुजरात-गोव्यावर कृपादृष्टी

गोवा व गुजरातमध्ये विजेचे अतिरिक्त उत्पादन आहे. त्यामुळे वीज बाहेर विकू शकतात तर मग त्यांना कोळसा कुठून मिळाला? अतिरिक्त वीजनिर्मिती कशी झाली? त्या राज्यांमधून आम्हीही वीज घेतली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने केले असावे अशी शंका निर्माण होत आहे.

राज्याच्या बदनामीचे प्रयत्न

केंद्रीय यंत्रणांना राज्यातील नेत्यांच्या मागे लावून बदनाम करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. बिगर भाजपशासित राज्ये आहेत. त्यांना बदनाम करून अकार्यक्षम आहेत हे दाखवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे का अशी शंका निर्माण झाली. कोळशाचे संकट केंद्राच्या नियोजनशून्य धोरणामुळे आले आहे.

मागणी 33 रेकची पण दिल्या 20 रेक
कोळशाचा साठा करण्याच्या सूचना देऊनही राज्यांनी साठा केला नाही हा केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांचा दावा खरा नाही. त्यांचे हे म्हणणे खरे नाही. याउलट महाजनकोच्या मागणीनुसार एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत पूर्ण पुरवठा कधीच केला नाही. मागणीच्या सरासरी 60 टक्केच पुरवठा केला. 2 जुलैला महानिर्मितीकडे 18. 11 लक्ष मेट्रिक टन इतका कोळसा होता. रोज कोळशाची 33 रेकची (रेल्वेच्या वाघिणी) मागणी असताना कोळसा कंपन्यांनी 20. 55 रेक कोळसा उपलब्ध करून दिला.

कोल इंडियाने साठा केला नाही

पावसाळ्यापूर्वी कोल इंडिया लिमिटेडने पावसाळ्यापूर्वी संपूर्ण देशासाठी 660 मिलियन टन कोळशाचा साठा करून ठेवणे गरजेचे असते. 44 टन मिलियन टन कोळशाची गरज होती, पण त्याचेही नियोजन केले नाही. हा नियोजनशून्य कारभार आहे. हे जाणूनबूजून केल्याचा संशय आहे.

n विजेचा तुटवडा होता तरीही महागडी वीज विकत घेऊन राज्यात 24 तास वीज पुरवठा केला. प्रति युनिट 16 तर कधी 20 रुपये मोजले आहेत. पण राज्याला अंधारात लोटले नाही. तरीही दरवाढ अजिबात करणार नाही.