
बिहारच्या राजकारणातील मोठी घडामोड देशासमोर आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आता राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी पुष्टी केली की, ते आगामी निवडणुकीत राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. २०२५ च्या निवडणुकीत पाचवा विजय आणि १० व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात धक्का बसला आहे.
राष्ट्रीय जनता दल म्हणजेच आरजेडी खासदार मनोज झा यांनी या परिस्थितीची तुलना व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या प्रकरणाशी केली आहे. त्यांनी याला ‘संमतीने केलेले अपहरण’ असे संबोधले असून, हा एक राजकीय अध्याय संपल्याचे लक्षण असल्याचे म्हटले आहे.
तेजस्वी यादवांचा हल्लाबोल
बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ‘भाजपने नितीश कुमारांना पूर्णपणे हायजॅक केले आहे. मी नेहमी म्हणायचो की नितीशजींना नवरदेव बनवून घोड्यावर तर बसवले आहे, पण त्यांचे फेरे कोणा दुसऱ्यासोबतच लावून दिले जात आहेत’, असा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेसकडून ‘कूप’चा आरोप
काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी याला लोकशाहीचा अपमान आणि सत्तेचा ‘कूप’ (बाह्य शक्तींच्या दबावातून सत्तापालट) म्हटले आहे. भाजपच्या ‘G2’ जोडीने हा कट रचून लोकांच्या जनादेशाचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नितीश कुमारांचे स्पष्टीकरण
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली भूमिका मांडताना नितीश कुमार म्हणाले की, ‘मी यावेळच्या निवडणुकीत राज्यसभेचा सदस्य होऊ इच्छितो. बिहारच्या जनतेशी असलेले माझे नाते आणि विकसित बिहार घडवण्याचा माझा संकल्प कायम राहील. राज्यात जे नवीन सरकार स्थापन होईल, त्याला माझे पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन असेल.’
आता बिहारच्या जनतेला हा निर्णय मान्य होतो का हे येणारा काळच ठरवेल. मात्र सध्या तरी बिहारी जनतेने रस्त्यांवर मोठी गर्दी करत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदावर राहिले पाहिजे असा आग्रह धरला आहे. त्यानंतर नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाणे हा आपला निर्णय, आपली इच्छा असल्याचं स्पष्ट केलं आहे.


























































