निवडणुकीनंतर नितीशकुमार एनडीएतून बाहेर पडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचे सहयोगी नितीशकुमार एनडीएतून बाहेर पडण्याच्या विचार करत आहेत. विरोधी पक्षांकडून नितीशकुमार यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार केले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यासंदर्भातील योजना आखत असून विरोधी पक्षातील काही नेत्यांसोबत त्यांनी चर्चादेखील केली आहे.  दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही यासंदर्भातील घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याची चर्चा आहे.

हैदराबादमध्ये अलीकडेच केसीआर आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली. या भेटीत राष्ट्रपती निवडणुकीत भाजपविरोधी सर्व पक्षांना एका मंचावर आणण्याचा तसेच या पदासाठी सर्वांना मान्य असा चेहरा पुढे करण्यावर चर्चा झाली आहे. त्या चर्चेदरम्यान प्रशांत किशोर यांनी नितीशकुमार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्याची कल्पना दिली, ज्यावर केसीआर यांनी सहमती दर्शविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडल्यास एनडीएच्या ऐक्यालाच सुरुंग लागणार आहे.

दिल्लीत नितीशकुमार यांची भेट घेण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी पाटणा येथे रात्रीच्या जेवणात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी गुप्तपणे चर्चा केली. त्याचवेळी केसीआर यांनी मुंबईत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यापूर्वी आरजेडी नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही केसीआर यांची भेट घेतली.

प्रशांत किशोर भाजप विरोधकांना एकत्र आणणार

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप विरोधी सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न प्रशांत किशोर यांनी सुरू केले आहेत. नितीशकुमार यांना विरोधी पक्षांचे उमेदवार बनवण्यासाठी प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस; बिहारमध्ये आरजेडी, पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या नेत्यांसोबत प्रशांत किशोर यांनी प्राथमिक चर्चा केल्याचे बोलले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचीही ते भेट घेऊ शकतात.

जातनिहाय जनगणनेवरून फारकत

बिहारमध्ये नितीशकुमार यांचा पक्ष जेडीयू आणि भाजपचे युतीचे सरकार आहे, मात्र जातनिहाय जनगणनेवरून जेडीयू आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. या मुद्दय़ावर बिहारमध्ये विरोधी पक्षात असणाऱया आरजेडीचा नितीश यांना पाठिंबा आहे. भाजपशी फारकत घेऊन ते एनडीएतून बाहेर पडल्यास नितीश यांच्या सरकारला आरजेडी पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात तगडा उमेदवार द्यावा अशी विरोधकांची रणनीती आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नावावर एकमत झाल्यास काँग्रेसलाही पाठिंबा द्यावा लागेल, असा त्यामागचा विचार आहे.