नगरमधील निसर्गसंपन्न कुमशेत गाव मूलभूत सुविधांपासून वंचित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्गाचे अद्भुत वरदान लाभलेल्या अकोले तालुक्यातील अतिदुर्गम असणाऱया पश्चिमेकडील कुमशेत या निसर्गसंपन्न गावाने दोन्ही लाटांमध्ये कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवले. पर्यटकांना नेहमीच खुणावणारे, गिर्यारोहकांच्या गर्दीने भरलेले आणि कात्राबाई खिंड-रतनगड-हरिश्चंद्रगड या ट्रेकचा बेसकॅम्प असलेले कुमशेत हे गाव सध्या रस्ते, आरोग्य, वीज, रोजगार, बंद झालेली एसटी बस, वैयक्तिक वनहक्क रखडलेले 96 दावे व समुदायिकचा एक प्रस्ताव आदी समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.

नगर जिह्याच्या आणि अकोले तालुक्याच्या शेवटच्या टोकावर सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या अतिदुर्गम भागातील कुमशेत या गावी कृषी विभागाने नऊ आणि वन विभागाने दोन असे एकूण 11 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले. पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱया या बंधाऱयांनी या खेडय़ात जलक्रांती केली. आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असणारे धारेराव देवस्थान याच ठिकाणी आहे. या मंदिराकडे जाणाऱया रस्त्यावरील पुलाला मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. पुलाचे कामही सुरू झाले. मात्र, ठेकेदाराने अर्धवट स्थितीत काम सोडून पळ काढला आहे. त्यामुळे भाविकांसह या परिसरात राहणाऱया ग्रामस्थांची पावसाळ्यात मोठी अडचण होत आहे.

या गावी जाणाऱया रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, त्यावरील उघडी पडलेली खडी या सर्व बाबींचा या गावी व वाडय़ा-वस्त्यांवर जाणाऱया लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या समस्यांमुळे कुमशेत आणि दुसरी आंबित बस सध्या बंदच आहे. जायनावाडी ते कुमशेत हा रस्ता ‘मुख्यमंत्री सडक योजने’तून दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला. मात्र, त्याचे काम सुरू झालेले नाही. कोरोना सुरू झाल्यापासून येथील अनेक तरुणांच्या आणि इतरांच्या हातांना काम मिळत नाही. त्यामुळे रोजगाराच्या समस्या येथे भेडसावत आहेत. पावसाळ्यात येथील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असतो.

गावापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असणाऱया शिरपुंजे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र आहे, तर त्यापुढे मोठय़ा अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जवळपास उपकेंद्र नसल्याने अनेक रुग्ण दवाखान्यात जाण्याचे टाळताना दिसतात. यावर उपाय म्हणून येथे एक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र सुरू करण्याची या गावाची मागणी आहे. 1998मध्ये झालेली नळपाणीपुरवठा योजना मोडकळीस आल्यामुळे अनेक वेळा महिलांना डोक्यावर हंडा घ्यावा लागत आहे.

पावसाळ्यात विजेची आणि दळणवळणाची मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्व बाबी पाहता, कुमशेतला तातडीने मदतीची गरज आहे. या ठिकाणी संपूर्ण राज्यातून विविध ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येत असतात. एका बाजूने असणारा कोकणकडा, कात्राबाईची खिंड असे निसर्गरम्य परिसर आहेत. कात्राबाईच्या खिंडीतून रतनगड-हरिश्चंद्रगड असा ट्रेक गिर्यारोहक नेहमीच करीत असतात. त्यामुळे त्यांचीदेखील या ठिकाणी वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी सोयी-सुविधांची उपलब्धता असणे आवश्यक आहे.

गाव शिवारात कृषी आणि वन विभागांनी बांधलेल्या बंधाऱयांमुळे जलक्रांती झाली. भरउन्हाळ्यातही या बंधाऱयांना पाणी असते. मात्र, नळपाणीपुरवठा योजना कायम सतावीत असल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा कायम आहे. ‘जलजीवन मिशन’चा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी केला. मात्र, तो ‘लाल फिती’त अडकला आहे. वनहक्क दावे, रस्ता आणि पूलदुरुस्तीसाठी हेलपाटे मारूनही मार्ग निघत नाही. सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाला दूर ठेवले आहे. त्यातच आदिवासी भागात लसीकरणाबाबत गैरसमज निर्माण होत असतानाही 45 वयाच्या पुढील नागरिकांचे प्रबोधन करीत 70 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण केले. आता तरुणाईचे लसीकरण करून घेणार आहे. शासनाने लक्ष घालून आमच्या समस्या सोडवाव्यात, अशी आमची इच्छा आहे. – सयाजी अस्वले, सरपंच, कुमशेत.