सत्तार-खैरे दिलजमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chandrakant khaire abdul sattar

मराठवाडय़ातील स्थानिक राजकारणावरून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यात गैरसमजुतीतून वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलविलेल्या बैठकीत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर सत्तार आणि खैरे यांच्यातील वाद मिटला. आमचे गैरसमज दूर झाले असून आमच्यात काही काद नाहीत. यापुढे आम्ही एकदिलानं आणि एकजुटीनं काम करणार असल्याची ग्वाही या दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

संभाजीनगर जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दरम्यान राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यात वाद निर्माण झाला होता. यातच शनिवारी सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यापार्श्वभूमीवर सत्तार यांनी रविवारी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर आज पुन्हा सायंकाळी सत्तार, खैरे या दोघांनीही मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही यावेळी उपस्थित होते.

मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांमधील वाद संपल्याचे स्पष्ट केले. खैरे आणि सत्तार यांच्यातील गैरसमज दूर झाले आहेत. दोघांनी पक्षप्रमुखांना त्रास होणार नाही, असं काम करणार नसल्याचा शब्द दिला आहे. दोन्ही नेते पक्षाच्या शिस्तीत आणि चौकटीत राहून काम करतील. पक्षाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यमंत्री सत्तार यांच्या राजीनाम्याच्या बातम्या विरोधकांनी पसरविल्या होत्या, असा आरोपही शिंदे यांनी केला.