पाकिस्तानी संसदेत ‘रात्रीस खेळ चाले’; इम्रान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्तेच्या धावपट्टीवर विरोधकांशी झुंज देत उभे राहिलेले इम्रान खान अखेर अविश्वास ठरावाच्या शेवटच्या चेंडूवर थेट सत्तेच्या मैदानाबाहेर फेकले गेले. पाकिस्तानी संसदेत शनिवारी मध्यरात्री अविश्वास ठरावावर मतदान झाले. सत्तेच्या स्पर्धेत विरोधकांनी बाजी मारून इम्रान सरकार उलथवून लावले.

अविश्वास ठरावावर बहुमतापेक्षा अधिक 174 खासदारांनी इम्रान यांच्याविरुद्ध मतदान केले. इम्रान व त्यांच्या समर्थकांनी मतदान केले नाही. मतदानावेळी इम्रान हे बनीगाला येथील घरी होते. रात्रीच त्यांनी लष्करप्रमुख जनरल बाजवा व आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांची भेट घेतली. इम्रान यांच्यावर विरोधकांनी टीका सुरू केली आहे. ‘पाकिस्तानचे वाईट स्वप्न संपले. जुन्या जखमा भरण्याची वेळ आलीय,’ असे ट्विट पीएमएल-एन नेत्या मरियम नवाज यांनी केले. दरम्यान, इम्रान यांचे सोशल मीडिया सांभाळणाऱया अर्सलान खालिद यांच्या घरावर रविवारी सकाळी छापेमारी करण्यात आली.

पीटीआय सामूहिक  राजीनामा देणार

इम्रान यांच्या पीटीआय पक्षाचे खासदार सामूहिक राजीनामा देणार आहेत. त्यांचा शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान बनवण्यास विरोध आहे. 16 अब्ज रुपयांचा आर्थिक अफरातफर करणाऱया व्यक्तीला पंतप्रधान म्हणून स्वीकारू शकत नाही, असा रोखठोक पवित्रा पीटीआयचे नेते फवाद चौधरी यांनी जाहीर केला आहे.

रात्री नेमके काय घडले?

  •  12.10 वा. सभापती, उपसभापतींनी राजीनामा दिला.
  •  12.12 वा. विरोधी ‘पीएमएलएन’चे अयाज सादिक हे सभापती बनले.
  • 12.14 वा.  इम्रान समर्थक खासदार संसदेतून बाहेर पडले.
  • 12.15 वा.  अविश्वास ठरावावर मतदानाला सुरुवात
  • 12.32 वा.  संसदेचे कामकाज पुन्हा सुरू; इम्रान यांचे सरकार कोसळले.