आनंदाची बातमी, तेवीस महिन्यांनंतर राज्यात पहिल्यांदाच ‘शून्य कोरोना मृत्यू’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनाचा आलेख घसरताना दिसतोय पण आजचा दिवस खास आहे. राज्यात आज एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. तब्बल 23 महिन्यांनंतर प्रथमच राज्यात ‘शून्य कोरोना मृत्यू’ची नोंद झाली. मुंबईतही गेले सहा दिवस एकही कोरोनाग्रस्त दगावला नाही हा एकप्रकारे कोरोनावर विजय मिळवल्याचेच संकेत आहे.

राज्यात आज 544 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. मात्र एकही मृत्यू झाला नाही. 1 एप्रिल 2020 नंतर प्रथमच आज एकाही कोरोना मृताचे वृत्त नाही. राज्य सरकारने केलेल्या कोरोना प्रतिबंधक कार्यामुळे हे शक्य झाले आहे. राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 45422 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 660 व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

मुंबईला मोठा दिलासा

मुंबईत गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 20 हजार 981 चाचण्यांमध्ये 100 बाधित आढळले आहेत. तर फेब्रुवारीत अकराव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तर सलग सहाव्या दिवशी शून्य मृत्यू नोंद झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत आढळलेल्या रुग्णांमधील 13 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील 2 जणांना ऑक्सिजनची गरज लागली. दरम्यान, मुंबईत एकाच दिवसात 168 जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे मुंबईत सध्या 689 सक्रिय रुग्ण राहिले आहेत. रुग्णसंख्या घटल्याने मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 5 हजार 405 दिवसांवर गेला आहे.