धारावीची शून्यावर आघाडी कायम; सलग दुसऱया दिवशी एकही रुग्ण नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेला रोखण्यासाठी सुरू असलेल्या राज्य आणि मुंबई महापालिकेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे तर सर्वाधिक धोका असलेल्या दाटीवाटीच्या आणि झोपडपट्टय़ांतूनही कोरोना उतरणीला लागला असून त्याची सुरुवात सोमवारी धारावीपासून झाली. धारावीत सोमवारी आणि आज सलग दुसऱया दिवशी एकही रुग्ण सापडला नाही तर सक्रिय रुग्णांची संख्याही 13 वरून 11 वर पोहोचली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिका सर्वसमावेशक असे ‘मुंबई मॉडेल’ राबवत असून त्याचा परिणाम आता सर्वत्र दिसू लागला असून मुंबईतील वाढती रुग्णसंख्या आता नियंत्रणात आली आहे. त्याचबरोबर जनजागृती, कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर कायम आहे. मुंबईतील झोपडपट्टीतून कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात कमी झाली असून कोरोनाला शून्यावर रोखण्याचे काम धारावीपासून सुरू झाले आहे. त्याचबरोबर कुर्ला, वरळी-कोळीवाडा, घाटकोपर, मुलुंड, अंधेरी, वांद्रय़ाच्या झोपडपट्टी भागात वाढलेली रुग्णसंख्या आता झपाटय़ाने नियंत्रणात आली आहे. धारावीत ‘मिशन धारावी’ तर इतर दाटीवाटीच्या भागात कोरोनाविरोधात पालिकेने ‘मिशन झीरो’सह  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेबरोबरच घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, औषधोपचार, सॅनिटायझर, जनजागृतीच्या माध्यमातून प्रभावी काम केल्यामुळे झोपडपट्टीतील कोरोना वेगाने नियंत्रणात आला. दरम्यान, धारावीबरोबर दादर आणि माहीम भागांतही कोरोना नियंत्रणात असून दादरमध्ये आज दिवसभरात 11 तर माहीममध्ये 12 रुग्ण सापडले.