कॅबिनेटच्या दिवशी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर व्हिजिटर्सना ‘नो एण्ट्री’

मंत्रालयातील व्हिजिटर्सच्या वाढत्या गर्दीचा फटका राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही बसला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर व्हिजिटर्सची प्रचंड गर्दी उसळते. त्यामुळे त्या दिवशी मंत्रिमंडळ बैठकीशी संबंधित सचिव, अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच सातव्या मजल्यावर प्रवेश दिला जाणार आहे. मात्र त्याचा मोठा फटाका मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत मागण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांना बसणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात किंवा सह्याद्री अतिथीगृहावर होते. सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वसमान्यांना प्रवेश मिळत नसल्यामुळे ‘सह्याद्री’मध्ये कोणाला शिरता येत नाही. तरीही ‘सह्याद्री’च्या बाहेर अनेक लोक मंत्र्यांची वाट बघत उभे असतात. पण कॅबिनेट संपल्यावर मंत्री मोटारीत बसून थेट बाहेर पडतात. पण मंत्रालयात ज्या दिवशी बैठक असते त्या दिवशी संपूर्ण मंत्रालयात व्हिजिटर्सची प्रचंड झुंबड उडते.

रुग्णांच्या नातेवाईकांना फटका?

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आहे. या कक्षात वैद्यकीय मदतीसाठी दररोज असंख्य लोक येत असतात. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच या कक्षात कामासाठी रुग्णांचे नातेवाईक आले तर त्यांना मोठा फटका बसण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

फेस रीडिंग कुचकामी

मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी फेशिअल रेकेग्निशन सिस्टम आणि डीजी अ‍ॅपची यंत्रणा निर्माण केली आहे. त्यामुळे गर्दी कमी होईल अशी प्रशासनाची अटकळ होती. पण ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. गर्दीवर कोणतेही निर्बंध आलेले नाहीत.