धबधबे, तलाव, धरणांवर नो एण्ट्री; ठाणे जिल्हाधिकाऱ्य़ांचे आदेश

कोरोना आता आटोक्यात येतोय. मस्त पाऊसही सुरू झालाय. बाहेर रोमँटीक वातावरण आहे. याचा फायदा उठवत तुम्ही एखाद्या तलावावर किंवा धबधब्यावर चिंब भिजण्याचा वन डे पिकनिक प्लान आखत असाल तर जरा थांबा. जिल्ह्यातील सर्व धबधबे, तलाव आणि धरणांवर उद्या बुधवारपासून नो एण्ट्री करण्यात आली आहे. तसे आदेशच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले असून त्याचे उल्लंघन केल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

कोविडचे संकट टळत असले तरी अशा पिकनिक स्पॉटवर पावसाळ्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात विकेंडला माळशेज घाटातील धबधब्यांपासून ते तानसा धरणापर्यंत सर्व स्पॉटवर पर्यटकांची गर्दी होत असते, पण गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे हे पावसाळी पर्यटन प्रशासनाला बंद करावे लागले. दुसरी लाट आल्यानतंर आता जरा कुठे रूग्णसंख्या कमी होऊ लागली आहे, पण कोणतीही जोखीम नको व गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश लागू

पावसाळी पिकनिक स्पॉटवर सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य नाही. तसेच पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी व कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. धबधबे, तलाव किंवा धरणे या ठिकाणांच्या सभोवताली एक किलोमीटर परिसरात ८ जून ते पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.

येथे जाऊ नका

ठाणे : येऊर धबधबे, सर्व तलाव, कळवा-मुब्रां रेती बंदर, मुब्रां बायपास येथील सर्व धबधबे, गायमुख रेतीबंदर, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरी किनारा.

मुरबाड : सिद्धगड डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे डॅम, माळशेत घाटातील सर्व धबधबे, पळू, खोपवली, गोरखगड, सिंगापूर, नानेघाट, धसई डॅम, आंबेटेव.

शहापूर : भातसा धरण, कुंडन दहिगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, चेरवली, अशोका धबधबा, खरोड, आजा पर्वत (डोळखांब) सापगाव.

कल्याण : कांबा पावशेपाडा, खडवली नदी परीसर, टिटवाळा नदी परीसर, गणेश घाट चौपाटी.

भिवंडी : नदी नाका, गणेशपुरी नदी परिसर.

अंबरनाथ : कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, दहिवली, मळीची वाडी.

आपली प्रतिक्रिया द्या