
नगर जिल्हयातील कर्जत तालुक्यातील कारागृहातून पाच आरोपी पळाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी चार पथके रवाना करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात संबंधीत पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती नगरचे प्रभारी पोलिस अधिक्षक सागर पाटील यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी कर्जत येथील कारागृहातून मोहन भोरे, अक्षय राऊत, ज्ञानेश्वर कोल्हे, गंगाधर जगताप असे पाच आरोपी सायंकाळच्या सुमारास पळून गेले होते. या प्रकरणानंतर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. पळून जाण्यासाठी आरोपींनी कोठडीतील छताचा भाग तोडला होता.तसेच त्यावर असलेले लोखंडी गज व कवले बाहरे काढून आरोपींनी पलायन केले होते.
या प्रकरणानंतर प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागासह चार ठिकाणी विविध पथके आरोपींच्या शोधासाठी पाठवली होती. नाशिक परीक्षेत्राचे पोलीस निरीक्षक छयरिंग डोरजे यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन कारागृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विशेष बैठकही घेतली. याबाबत अधीक्षक पाटील यांनी मंगळवार दुपारपर्यंत आरोपींचा छडा लागलेला नाही चार पथके त्यांच्या शोधासाठी पाठवलेली आहेत. तसचे जे पोलिस कामावर होते, त्यांचीही चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. नगर जिल्ह्यामध्ये याआधाही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अनेक गुन्हेगार पळून गेले आहे, अशाच प्रकारची घटना कोपरगाव तालुक्यामध्ये घडली असून येथील तुरुंगाची भिंत तोडून आरोपी पसार झाले होते. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर असलेल्या सर्व जेलच्या संदर्भातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.






























































