
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्यात येणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. मात्र आता उपमुख्यमंत्री आणि राज्य काँग्रेस अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी या अफवांवर पूर्णविराम घातला आहे. बुधवारी पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांनी स्पष्ट केले की, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कर्नाटक दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्रीपदात बदल करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
डी.के. शिवकुमार म्हणाले की, “मी कर्नाटक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे आणि राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. या भेटी आणि चर्चा प्रोटोकॉलनुसार होतात. याबाबत सार्वजनिकपणे चर्चा करता येत नाही.” शिवकुमार पुढे म्हणाले, “राहुल गांधींशी मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांनी आम्हाला चांगले काम सुरू ठेवण्यास सांगितले आहे आणि आम्ही त्यानुसार काम करत राहू.”
दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्याशी मैसूर विमानतळावर भेट घेतली होती. या भेटीनंतर सत्तासंघर्षाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या. शिवकुमार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात लिहिले होते, “प्रयास विफल हो सकते हैं, लेकिन प्रार्थनाएं नहीं”. या पोस्टला राहुल गांधींशी झालेल्या चर्चेशी जोडले जात होते. पण शिवकुमार यांनी हे स्पष्ट केले की, ही पोस्ट काही नवीन नाही आणि ते आधीही असं म्हणाले आहेत.


























































