
इराण आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वक्तव्य केले आहे. “मी सध्या कुठेही सैन्य पाठवत नाहीये,” असे स्पष्ट करत त्यांनी परिस्थिती लवकरच सामान्य होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी लष्करी हालचालींबाबत सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले की, “अनेक लोक सैन्य तैनात करण्याबाबत बोलत आहेत, पण सध्या तशी कोणतीही योजना नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि मला विश्वास आहे की सर्व काही लवकरच शांत होईल.”
व्यापारी दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ (Strait of Hormuz) बद्दल बोलताना ट्रम्प यांनी मित्रदेशांना त्यांची जबाबदारी ओळखण्याचे आवाहन केले. “जपान आणि इतर देशांना या मार्गावरून मोठ्या प्रमाणात तेल मिळते. त्यामुळे या सागरी मार्गाच्या सुरक्षेसाठी त्यांनी आता स्वतः पुढाकार घ्यावा. अमेरिका प्रत्येक वेळी इतर देशांच्या संरक्षणासाठी धावून जाणार नाही,” असे ते म्हणाले.
इराणमधील अंतर्गत परिस्थितीवर भाष्य करताना ट्रम्प यांनी दावा केला की, इराणचे सध्याचे नेतृत्व आता खिळखिळे झाले आहे. “त्यांचे नेतृत्व आता संपले आहे. आम्ही जे पाऊल उचलले होते, त्यामुळे जग अधिक सुरक्षित झाले आहे,” असेही ते म्हणाले.




























































