कोरोनाचा मुंबईकरांना असाही दिलासा, या वर्षी मालमत्ता कर वाढणार नाही!

कोरोनाच्या प्रभावामुळे यावर्षी मुंबईकरांच्या मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे लाखो मालमत्ता करदात्यांना मोठा फायदा होणार आहे. शिवाय लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात असलेल्या मुंबईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. उप आयुक्त सुनील धामणे यांनी ही माहिती दिली. पालिकेच्या मालमत्ता करात दर पाच वर्षांची 8 टक्क्यांची वाढ केली जाते. दरम्यान, पालिकेने 500 चौरस फुटांपर्यंत मालमत्तांना याआधीच करमुक्त केले आहे.

पालिकेला जकात करातून सात हजार कोटी वर्षाला मिळत होते. जकात कर रद्द करून केंद्र सरकारने जीएसटी लागू केला. यामुळे पालिकेला या महसुलावर पाणी सोडावे लागले. पालिकेला जकात करामधून मिळणारी रक्कम राज्य सरकारकडून जीएसटीच्या परताव्याच्या माध्यमातून दिली जात आहे. 2022 पर्यंत ही रक्कम पालिकेला दिली जाणार असून पालिकेला महसूल वाढीसाठी इतर पर्याय शोधण्यास सांगण्यात आले आहे. पालिकेने आपला महसूल वाढीसाठी मालमत्ता कर वसुली करून वर्षाला पाच हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट आल्यामुळे मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

पुढील वर्षीचा निर्णय तत्कालीन स्थितीवर

मुंबईत एकूण 4 लाख 20 हजार मालमत्ता असून यापैकी 1 लाख 37 हजार मालमत्ता या 500 चौरस फुटांच्या खालच्या आहेत. ज्यांना पालिकेकडून मालमत्ता कर याआधीच माफ करण्यात आला  आहे.  उर्वरित 2 लाख 83  हजार मालमत्ता धारकांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. दरवर्षी सुमारे 5 हजार कोटी रूपयांचे उत्पन्न मालमत्ता कराद्वारे पालिकेला मिळते. दरम्यान, यावर्षी मालमत्ता कर माफ केल्यामुळे येणारी तूट भरून काढण्यासाठी तत्कालीन स्थितीवरून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या