
सामना प्रतिनिधी । दहीपुरी
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दहीपुरी येथे दहीपुरी-दुधपुरी रोड लगत दहीपुरी येथील शेतकरी मंजीत त्र्यंबक साळुंके यांची शेती आहे. गट. नं. ४०७ सोयाबीन वर रोगट्ं पडल्यामुळे दोन एकर च्या पुढे सोयाबीन हृदयावर दगड ठेऊन औत पाळीने मोडले. सोयाबीनच्या बियाणे पेरणीसह दोनदा खते व दोन वेळा खुरपण करून महागडी किटनाशकांची तीन वेळा फवारणी करूनही दिवसेंदिवस सोयाबीन पिवळे पडून ठिकठिकाणी सुकू लागल्याने भरमसाठ खर्च करूनही स्वतःच्याच हाताने डोळ्यात पाणी आणून दोन एकरच्या पुढे सोयाबीन मोडले.
दहीपुरी-दुधपुरीसह पानेगाव, मानेपुरी, नि. पिंपळगाव, सारंगपुर, वाघलखेडा, काटखेडा, हारतखेडा, भाटखेडा, पराडा, भालगाव, बोरी, मसई, गोविंदपुर, तांडा शेवगा, बठाण इत्यादी परिसरात अद्यापही जोरदार पावसाअभावी कापूस, सोयाबीन, मका, मुग, उडीद, भुईमुग इत्यादी पिकांवर कित्येक महागड्या फवारण्या करूनही मुळमुळ पावसामुळे रोगटे पडून पिके वाया जाण्याची शक्यता आहे. या परिसरात दोन वर्षांपासून अपेक्षित पाऊस नसल्यामुळे तलाव, विहीरी व बोअर अद्यापही कोरडेठाक आहे आणि यावर्षी संपूर्ण जुन, जुलै मध्ये सुद्धा अपेक्षित पाऊस नाही. अत्यल्प पावसामुळे भरमसाठ खर्च करूनही पिकांवर रोग पडल्याने शेतकऱ्यांमधे चिंतेचे वातावरण आहे.



























































