
सामना ऑनलाईन, स्टॉकहोम
‘इसिस’ने सेक्स स्लेव्ह बनविल्यानंतर दहशतवादांच्या तावडीतून सुटून युद्ध काळातील लैंगिक अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या इराकच्या नादिया मुराद आणि कांगोतील डॉ. डेनिस मुकवेगे यांना 2018 साठीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.युद्धावेळी आणि शस्त्र संघर्षाच्या काळात महिलांवर जगभरात अनेक ठिकाणी भयंकर लैंगिक अत्याचार होतात. महिलांचे मूलभूत अधिकार आणि सुरक्षा यांची जपवणूक युद्धकाळात झाल्यास जगात शांतता नांदेल. त्यासाठी नादिया मुराद आणि डॉ. डेनिस मुकवेगे यांचे कार्य प्रेरणादायी आहे अशा शब्दांत नोबेल समितीने या दोघांचा गौरव केला आहे. 10 डिसेंबर रोजी दोघांना सन्मानपूर्वक नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अनेक हल्ल्यांना तोंड देऊन उभे राहिलेले डॉक्टर
कांगो या गरीब आफ्रिकन देशात अनेक वर्षांपासून गृहयुद्ध सुरू आहे. यात अनेक महिलांवर सामूहिक बलात्काराच्या घटना वारंवार होतात. या महिलांवर उपचार करण्याचे काम 63 वर्षीय डॉ. डेनिस मुकवेगे करीत आहेत. कांगो सरकारचा त्यांना विरोध आहे. अनेकदा त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले. त्यांच्या मुलीचे अपहरणही केले गेले, पण न घाबरता डॉ. डेनिस मुकवेगे वैद्यकीय सेवा देत आहेत.
331 जणांमधून निवड
2018 मध्ये नोबेल शांतता पुरस्कारासाठी जगभरातून 331 जणांची नावे आली होती. त्यात 216 लोक आणि 115 संघटना होत्या. त्यातून नादिया मुराद आणि डॉ. डेनिस मुकवेगे यांची निवड करण्यात आली.
19 व्या वर्षी अपहरण; सेक्स स्लेव्ह बनविले
इराकमधील नादिया मुराद यांचा संघर्ष कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला हादरविणारा आहे. ‘इसिस’च्या रक्तरंजित हिंसाचाराने उद्ध्वस्त झालेल्या इराकमध्ये यजीदी कुर्दिश या अल्पसंख्याक समाजाच्या जनतेवर क्रूर अत्याचार करण्यात आले. नादिया सध्या 25 वर्षांच्या आहेत. 19 वर्षांच्या असताना ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी नादिया यांच्या गावावर हल्ला करून 600 जणांना ठार केले होते. नादिया यांच्या कुटुंबातील अनेकांची हत्या केली. दहशतवाद्यांनी नादियासह 6500 महिलांचे अपहरण करून गुलाम बनविले. नादिया यांच्यावर अनेकदा बलात्कार करून अमानुष अत्याचार केला. एके दिवशी ‘इसिस’च्या तावडीतून पळ काढला आणि महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविला. नादिया यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.






























































