उत्तर हिंदुस्थानात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ, 68 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर हिंदुस्थानातील काही राज्यांमध्ये वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यात तब्बल 68 जणांचा मृत्यू झाला आहे. यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

रविवारी उत्तर हिंदुस्थानामध्ये प्रचंड पाऊस कोसळला. पावसासोबत विजांचा कडकडाटही होत होता. काही ठिकाणी वीज पडून नागरिक मृत्युमुखी पडले. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त म्हणजे 41 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील सर्वाधिक मृत्यू प्रयागराज येथे झाले असून या घटनांतील मृत्यू पावलेल्यांची संख्या 14 इतकी आहे.

तसंच कानपूर ग्रामीण आणि फतेहपूर येथे प्रत्येकी पाच, कौशांबी येथे चार, फिरोजाबाद येथे 3, उन्नाव-हमीरपूर-सोनभद्र येथे प्रत्येकी दोन, तर कानपूर नगर-प्रतापगढ-हरदोई-मिर्झापूर येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याखेरीज 200 जनावरंही दगावली आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्काळ साहाय्य पुरवण्याचे आदेश दिले आहेत, तसंच आर्थिक मदतही जाहीर केली आहे.

राजस्थानमध्येही वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यात जयपूरमध्ये 11, धौलपूरमध्ये 3, कोटा येथे 4, झालावाड आणि बारां येथे 1 असे लोक दगावले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना राजस्थान सरकारतर्फे 5 लाखांच्या भरपाईची घोषणा करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातही वीज पडून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात श्योपूर आणि ग्वाल्हेर येथे प्रत्येकी 2 तर शिवपुरी-अनुपपूर-बैतुल येथे प्रत्येकी एक जण दगावला आहे.