उत्तर हिंदुस्थान गारठला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Weather: Winter in North India
Prayagraj: Commuters cross a railway track on a cold and wintry morning in Prayagraj (Allahabad), Saturday, Dec. 28, 2019. (PTI Photo)(PTI12_28_2019_000047B)

उत्तर हिंदुस्थानात अक्षरशः गोठवून टाकणारी थंडी पडली आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. लडाखच्या द्रास खोऱयापासून ते दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात तापमान प्रचंड घसरले असून एक नवा विक्रम नोंदवला आहे. द्रासमध्ये उणे 20 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. दिल्लीत आज शनिवारी पारा 1.7 डिग्री सेल्सियपर्यंत घसरला. तर राजस्थानच्या शेखावटीत किमान तापमान उणे 4 डिग्री सेल्सियस इतके नोंदवले गेले. डिसेंबरमध्ये आतापर्यंत 8 थंड आणि 7 अतिथंड दिवस म्हणून नोंद झाली आहे.

उत्तर प्रदेशात थंडीने कुडकुडून 28 जणांचा मृत्यू झाला. बुंदेलखंडमध्ये गेल्या चार दिवसांपासून थंडीची लाट पसरली असून हिमालयात सातत्याने होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे पारा प्रचंड घसरला आहे. बुलंदशहर, बागपत, बिजनौर, हापूर जिह्यात 3 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. मथुरामध्ये पारा 2 डिग्री सेल्सियपर्यंत घसरला. लखनौमध्ये 7.7 डिग्री तर सीतापूर, अमेठी, आंबेडकर नगर, बहराईच, श्रावस्ती आणि बलमरामपूरमध्ये 4 डिग्री सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.

पंजाब, हरयाणात थंडीचा कहर

पंजाब आणि हरयाणातही थंडीने अक्षरशः कहर केला आहे. 31 डिसेंबरपर्यंत येथे थंडीची लाट कायम राहील असे हवामान विभागाने म्हटले आहे. याशिवाय अनेक भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. हरयाणाच्या हिसारमध्ये तापमान 0.2 डिग्री, नारनौलमध्ये 0.5 तर रोहतकमध्ये 1.8 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये किमान तापमान 4.7 डिग्री तर लुधियानात 5.6 डिग्री आणि बठिंडामध्ये 2.3 डिग्री सेल्सियसपर्यंत घसरले आहे.

हिमालयात जबरदस्त बर्फवृष्टी

कारगील जिह्यातल्या द्रासमध्ये तापमान प्रचंड घसरले असून द्रासला जगातील दुसरे सर्वाधिक थंड शहर मानले जाते. द्रासमध्ये उणे 20 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली असून हिमालयात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे येथील तापमानातही प्रचंड घट झाली आहे.
राजस्थान गोठला

राजस्थानाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. शेखावटीत पारा उणे 4 डिग्री सेल्सियसपर्यंत घसरला. सीकरमधील तापमान उणे 1 डिग्रीपर्यंत घसरले. जयपूरमध्ये पाच वर्षांनंतर पारा 4 डिग्रीपर्यंत खाली आला. जयपूरच्या जोबनेरमध्ये उणे 1 डिग्री, फतेहपूरमध्ये उणे 3, माऊंट अबूमध्ये उणे 1 तर चुरूमध्ये उणे 6 डिग्रीपर्यंत पारा घसरला. तापमानात प्रचंड घट झाल्याने पहाटेच्या सुमारास शेतांमध्ये, वाहनांवर दवबिंदू गोठल्याचे चित्र आहे.

वाहतुकीवर परिणाम

थंडीच्या लाटेचा वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे चित्र आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ा उशिराने धावत असून विमानांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. दिल्ली विमानतळावर कमी दृश्यमानतेमुळे चार विमान उड्डाणांची दिशा बदलण्यात आली. दरम्यान, देशभरात 194 रेल्वेगाडय़ा उशिराने धावत असून 71 रेल्वेगाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. धुक्यामुळे 11 रेल्वेगाडय़ांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

दिल्लीत 14 दिवसांपासून थंडीची लाट

दिल्लीचा पारा 2.4 डिग्री सेल्सियसपर्यंत घसरला. लोधी रोडमध्ये 1.7, आया नगरमध्ये 1.9 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दिल्ली एनसीआरमध्ये अनेक भागात धुरके पसरले होते. दिल्लीत प्रदूषणाची पातळीही वाढली असून हवा प्रचंड खराब झाली आहे. दरम्यान, गेल्या 14 दिवसांपासून दिल्लीत थंडीची लाट आहे. 1997 सालच्या डिसेंबरमध्ये सलग 13 दिवस थंडीची लाट आली होती. 1901 ते 2018 दरम्यान केवळ चार वेळा डिसेंबरचे कमाल तापमान 20 डिग्री सेल्सियसच्याही खाली आले आहे. यंदा 26 डिसेंबर रोजी तापमान 19.85 डिग्रीपर्यंत घसरले असून थंडीची लाट आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.