शिवशक्तीचे तुफान… नाशिकमध्ये शिवसेना-मनसेची दणदणीत, खणखणीत विराट सभा; बोगस मोदी गॅरंटी नाही! हा ठाकरेंचा शब्द आहे!! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे जनतेला वचन

प्रभू श्रीरामांच्या तपोभूमीतून आज शिवसेना-मनसे युतीच्या संयुक्त सभांचा झंझावात सुरू झाला. नाशिकमधील ऐतिहासिक हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सभेला अथांग जनसागर लोटला होता. याच गर्दीच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या सर्वांगीण विकासाचा वचननामा समोर ठेवला. ‘हा वचननामा म्हणजे नुसता छापलेला रंगीत कागद नाही. ही बोगस मोदी गॅरंटी नाही. हा ठाकरेंचा शब्द आहे आणि ठाकरे जे बोलतात ते करतातच’, अशी गर्जना ठाकरे बंधूंनी यावेळी केली आणि आशीर्वादाचे हजारो हात गर्दीतून उंचावले.

शिवशक्तीच्या पहिल्याच संयुक्त प्रचार सभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेली फोडाफोडी, बिनविरोध पॅटर्न, दडपशाही, पैसा, ब्लॅकमेलिंगच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला. सत्ताधाऱयांची दाणादाण उडवणारी ही सभा ठरली.

यांच्या हुकूमशाहीविरुद्ध बंगालमध्ये ममता बॅनर्जी रस्त्यावरती उतरल्यात. अख्खा बंगालच रस्त्यावरती उतरलाय. मग हा माझा छत्रपती शिवरायांचा, शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र यांच्या दडपशाहीच्या विरुद्ध शेपूट घालून आत बसणार का? ज्या महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली, त्याची दुर्दशा करणाऱयांच्या हातामध्ये तुम्ही तुमचं नशीब परत एकदा देणार आहात का? – उद्धव ठाकरे

उत्तम शहर, भवितव्यासाठी शिवसेना-मनसेला सत्ता देऊन बघा. पुन्हा चमत्कार घडवल्याशिवाय राहणार नाही. उद्याचे नगरसेवक आमच्या पाठीशी आहेतच. त्यामुळे बोर्डावर शिवसेना-मनसे युतीचे 100 नगरसेवक दिसले पाहिजेत. यासाठी कुठेही विकले जाऊ नका, जातीपातीच्या वादात पडू नका, शहर सुंदर करण्यासाठी सज्ज व्हा. – राज ठाकरे