ईडी नव्हे…हे तर मोदी समन्स; तेलंगणातील मंत्री के टी रामाराव यांचा पंतप्रधानांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारत राष्ट्र समितीतील महत्त्वाचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा मुलगा केटी रामाराव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रावर टिकास्त्र सोडले. विरोधी पक्षातील नेत्यांचा विनाकारण छळ करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप रामाराव यांनी केला. केटी रामाराव यांची बहीण आणि तेलंगणातील आमदार के. कविता यांच्यासह विरोधी नेत्यांना त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे ते म्हणाले. हे ईडीचे समन्स नसून मोदी समन्स आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने आपली बहीण आणि बीआरएस एमएलसी के कविता यांना समन्स बजावले आहे. कविता ईडीसमोर हजर राहतील आणि तपास यंत्रणांना सहकार्य करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 2014 मध्ये मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून देशभरात 5,400 हून अधिक छापे पडले आहेत. ईडी ही देशातील लोकशाही मिटविण्याची एक यंत्रणा आहे. 5,000 पेक्षा जास्त छापे आणि तपासांपैकी आतापर्यंत केवळ 23 केसचाच पुढील तपास सुरू आहे. कर्नाटकातील भाजप नेते विरूपक्षा यांच्या मुलाकडे काही कोटींची रोकड सापडली. त्यांचे नाव लाचखोरी प्रकरणात होते. या प्रकरणात पुढे कोणताही तपास, शोध, छापे टाकले गेल नाही किंवा कोणालाही अटक झाली नाही. तेलंगणामध्येही कोमेटिरडी राजागोपल रेड्डी यांना वळवण्यासाठी काही कोटी देण्यात आले नाही काय, असा सवाल त्यांनी केला. भाजप नेते यावर बोलण्यास तयार नाहीत. आसासममध्ये हिमंता बिस्वास शर्मा दुसर्‍या टर्ममध्ये मुख्यमंत्रीपदी आहेत. त्याच्यावरील खटल्यांचे आणि आरोपांचे काय झाले, भाजपसोबत असल्याने त्यांच्यावरील आरोप धुऊन निघाले काय… अचानक ते स्वच्छ झाले आहेत, असा टोलाही रामाराव यांनी लगावला.

हे ईडीचे समन्स नाहीत, तर मोदी समन्स आहेत. आम्ही त्यास सामोरे जाऊ. छापासत्र, तपास आणि समन्स फक्त आमच्या मुख्यमंत्री आणि बीआरएसच्या मनोबल खच्ची करण्यासाठी आहे. मात्र, आम्ही डगमगणार नाही. आम्ही या विरोधात राजकीय लढा देऊ, असेही रामाराव यांनी स्पष्ट केले.

अदानी प्रकरणावरही रामाराव यांनी केंद्रावर टीका केली. एक राष्ट्र, एक मित्र ही त्यांची घोषणा आहे. ही मैत्री जपण्यासाठी अदानी आणि पंतप्रधान कोणत्याही थराला जातील, असा आरोपही रामाराव यांनी केला. भाजपचे डबल-इंजिन सरकार म्हणजे काय हे सर्वांना माहित आहे. एक इंजिन मोदी आहे, तर दुसरे अदानी आहे. हे डबल इंजिन ‘मोडानी’ आहे, असा टोला रामाराव यांनी लगावला. पंतप्रधान मोदी यावर मौन पाळले आहे. यावरून असे दिसते आहे की अदानी ही पंतप्रधान मोदींची बेनामी कंपनी आहे. कंपनीविरूद्ध कोणतीही खटले नाहीत, असेही ते म्हणाले. अदानीला फायदा करण्यासाठी केलेली धोरणे पहा. मुंद्रा बंदर पहा, जिथे अमली पदार्थ सापडली. तो घोटाळा नाही का, असा सवालही त्यांनी केला.

भाजपच्या नेत्यांना कोणत्याही प्रकरणात अटक झाली आहे काय, असा सवाल त्यांनी केला. कर्नाटक सरकारला सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे म्हटले जाते. त्या सरकारविरूद्ध काही कारवाई केली आहे का. कर्नाटकच्या खासगी शाळा आणि व्यवस्थापनाने 40% कमिशनबद्दल लिहिले. पण काय झाले? कोणतेही शोध किंवा छापे घेण्यात आले नाहीत. गुजरातमध्ये बंदी असूनही सहजतेने मद्य मिळते तोच मोठा मद्यघोटाळा आहे, असा आरोपही त्यांनी केला.