नगर महापालिकेला वीज, पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस; महावितरणसह जलसंपदा विभागाचे 14 कोटी थकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मार्च अखेरीच्या वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी महावितरण व जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंधारे कार्यालयाकडून त्यांचा सर्वांत मोठा ग्राहक असलेल्या महापालिकेकडे विजेचे बिल व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी पाठपुरावा सुरू झाला आहे. दोन्ही विभागांच्या सुमारे साडेचौदा कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी त्यांनी वीजपुरवठा व पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावली आहे. शासकीय विभागांच्या टार्गेट पूर्तीच्या स्पर्धेत शहराचा पाणीपुरवठा मात्र खंडित होऊन अप्रत्यक्षपणे नगरकर वेठीस धरले जाणार आहेत.

पाणी योजना व पथदिव्यांच्या विजेच्या चालू बिलांपोटी मनपाकडे महावितरणचे सुमारे सात कोटी रुपये थकीत आहेत. तर, मुळा धरणातून उपसल्या जाणाऱया बिगर सिंचनाच्या पाण्याची सुमारे साडेसात कोटींची थकबाकी आहे. दुसरीकडे, मुळा पाटबंधारे खात्याकडूनही मनपाला नोटीस देण्यात आली होती. 6 कोटी 41 लाखांची पाणीपट्टी व त्यावर लोकल फंड, अधिभार, दंड अशी एकूण 7 कोटी 55 लाखांची थकबाकी मनपाकडे आहे. जलसंपदा विभागाने मनपाला नोटीस बजावून 15 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण थकबाकी भरण्याची मुदत दिली होती. तसेच, पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता.

मनपा प्रशासनाने महावितरणला डिसेंबरपर्यंतच्या पाणी योजनेच्या बिलापोटी रक्कम अदा केली आहे. मात्र, पथदिव्यांची सुमारे तीन महिन्यांची 80 लाखांची थकबाकी कायम आहे. जलसंपदा विभागाला मनपाने 7 कोटी 55 लाखांपैकी सुमारे 18 लाख रुपये अदा करून तूर्तास कारवाई टळली आहे. मात्र, उर्वरित थकबाकीपोटी दोन्ही विभागांकडून नोटीस, इशारा दिला जात आहे. मनपाची आर्थिक स्थिती पाहाता, सदर बिले अदा होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे प्रशासन स्तरावर सुरू असलेल्या टार्गेटच्या खेळात ऐन उन्हाळ्यात नगर शहराच्या पाणीपुरवठय़ावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.