प्रबळ दावेदार नोवाक जोकोविच अमेरिकन ओपन स्पर्धेतून बाहेर, लाइन वुमनला चेंडू मारल्याने अपात्र ठरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्ड स्लॅम जिंकण्यासाठीचा प्रबळ दावेदार आणि नंबर वन सीडेड नोवाक जोकोविच याला चौथ्या फेरीदरम्यान धक्कादायकरीत्या बाहेर पडावे लागले. स्पेनच्या पाब्लो बुस्ताविरुद्धच्या पुरुष एकेरीच्या लढतीत पहिल्या सेटमध्ये 5-6 अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या नोवाक जोकोविच याने संतापाच्या भरात लाइन वुमनच्या दिशेने चेंडू भिरकावला. चेंडू मानेला लागल्यानंतर ती महिला अधिकारी त्याच क्षणी कोसळली. तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. नोवाक जोकोविचसह इतर अधिकारी तिच्याकडे आले. थोडय़ा वेळानंतर ती महिला अधिकारी उठली व कोर्टबाहेर गेली. या घटनेनंतर स्पर्धा आयोजकांनी नोवाक जोकोविचवर शिस्तभंगाची कारवाई करीत या स्पर्धेसाठी अपात्र ठरवले आणि त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

तिसराच खेळाडू

ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत अपात्र ठरणारा नोवाक जोकोविच हा तिसराच खेळाडू ठरला आहे. याआधी 1990 साली झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जॉन मॅकेन्रोवर तसेच 2000 साली झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत स्टीफन कुबॅकवर ही आपत्ती ओढवली होती.

मला माफ करा – जोकोविच

या घटनेनंतर नोवाक जोकोविच याने इन्स्टाग्राम या सोशल साईटवर प्रतिक्रिया पोस्ट करीत माफी मागितली. यावेळी तो म्हणाला, माझ्याकडून चूक झाली. यामुळे मला प्रचंड दुःख झाले आहे. या स्पर्धेसाठी अपात्र ठरलो. या घटनेमुळे माझ्यामध्ये बदल होईल, एक चांगला माणूस होण्याच्या दिशेने पाऊल टाकले जाईल. अमेरिकन ओपन स्पर्धा आयोजकांसह माझ्या कृतीमुळे दुःखी झालेल्या सर्वांचीच माफी मागतो.

बक्षिसाची रक्कम अन् रँकिंग गुणही गमावले

युनायटेड स्टेट टेनिस असोसिएशनकडून नोवाक जोकोविचवर करण्यात आलेल्या कारवाईला दुजोरा देण्यात आला. त्यांच्याकडून पुढे स्पष्ट करण्यात आले की, नोवाक जोकोविचला मिळण्यात येणारी बक्षिसाची रक्कम कापण्यात येणार असून रँकिंग गुणावरही त्याला पाणी सोडावे लागणार आहे. दरम्यान, नोवाक जोकोविच याने या स्पर्धेत चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे त्याला 2 लाख 50 हजार अमेरिकन डॉलर्स मिळणार होते.